बेलापूरमध्ये रामभक्तीचा जल्लोष; दोन शतकांची अखंड परंपरा pudhari photo
मुंबई

Belapur Ram Navami festival : बेलापूरमध्ये रामभक्तीचा जल्लोष; दोन शतकांची अखंड परंपरा

गावातील पुरातन मंदिर हे या उत्सवाचे आध्यात्मिक केंद्र

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई :नवी मुंबईतील बेलापूर गावात गेले आठ दिवस रामनवमी उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. वेदघोष, मंत्रोच्चार आणि घंटानादामुळे संपूर्ण परिसर पवित्र आणि मंगलमय वातावरणाने भारून गेला आहे. या उत्सवाला 200 वर्षांची अखंड परंपरा लाभली आहे. हा सोहळा आजही अत्यंत भक्तिभावाने, निष्ठेने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

गावातील पुरातन मंदिर हे या उत्सवाचे आध्यात्मिक केंद्र आहे. रामनवमीच्या आठवडाभर आधीपासूनच मंदिरात स्वच्छता, सजावट, पूजाअर्चा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांची लगबग सुरू होती.

रामनवमीच्या दिवशी दुपारी साजरा होणारा राम जन्म सोहळा हा या उत्सवाचा आत्मा आहे. ‌‘राम जन्मला ग, राम जन्मला‌’ या भक्तिमय घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून जातो. यावेळी महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून भजन, नामस्मरण आणि आरतीत सहभागी होतो. रात्री गावातून काढण्यात येणारी पालखी ही श्रद्धा, एकात्मता आणि भक्तीचे प्रतीक आहे.

टाळ-मृदुंगाच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत आणि ‌‘श्रीराम जय राम जयजय राम‌’ या अखंड नामघोषात भाविक तल्लीन होतात. संपूर्ण गाव भक्तीच्या रंगात रंगून जाते. हा पवित्र उत्सव केवळ रामनवमीपुरता मर्यादित न राहता हनुमान जन्मोत्सवापर्यंत सुरू राहतो. या काळात दररोज भजन, कीर्तन आणि रामायण पारायण यांचे आयोजन केले जाते.

कुस्तीचा फड विशेष आकर्षण

उत्सवाच्या सांगतेला भरवली जाणारी भव्य जत्रा ही बेलापूर पट्टीतील सर्वात मोठी असते. यात विशेष आकर्षण ठरते ते गावाच्या लाल मातीत रंगणारे कुस्त्यांचा फड. परिश्रम, ताकद आणि शौर्य यांचा संगम असलेल्या या स्पर्धांमध्ये विजेत्याला ‌‘बेलापूर श्री‌’ हा मानाचा किताब देऊन गौरविण्यात येते.

नवी मुंबईसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरातही बेलापूर गावाने जपलेली ही परंपरा केवळ धार्मिक नाही, तर ती संस्कृती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे जिवंत प्रतीक आहे. बदलत्या काळातही भक्तीचा दीप अखंड तेवत ठेवणारा हा सोहळा नवी मुंबईच्या सांस्कृतिक वैभवाची अभिमानास्पद साक्ष देतो.
कृष्णा नमन कोळी, बेलापूर रहिवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT