Mumbai BDD chawl Pudhari
मुंबई

BDD Chawl Mumbai: 160 स्क्वेअर फुटाच्या घरात आयुष्य काढले, आज त्याच जागेवर टॉवर; बीडीडी चाळींच्या रहिवाशांचं स्वप्न अखेर पूर्ण

Worli BDD Chawl redevelopment eligible residents: इमारत क्रमांक 1 मधील डी व ई विंगमधील 556 सदनिकांचा ताबा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात येणार

पुढारी वृत्तसेवा

Mumbai BDD Chawl Redevelopment Project First Phase

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत नव्या घरात जायची इच्छा होती. ती आज पूर्ण होत आहे. वरळी बीडीडी चाळीतील 160 स्क्वेअर फुटाच्या घरात आम्ही आयुष्य काढले. आता त्याच जागेवर चाळीस मजली टॉवर उभा राहिला. त्यातल्या अठ्ठावीसव्या मजल्यावर 500 स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये रहायला जात आहोत, हे सांगताना पुष्पा काळे यांचा आनंद शब्दांत बसत नव्हता आणि डोळ्यांत मावत नव्हता.

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होय. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे वरळी, ना.म. जोशी मार्ग-परळ, नायगाव येथील सुमारे 86 एकरवर वसलेल्या सुमारे 207 चाळींचा पुनर्विकास हाती घेण्यात आला. त्यात 15 हजार 593 रहिवाशांचे पुनर्वसन केले जात आहे. येत्या डिसेंबरपर्यंत तिन्ही बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात 3 हजार 989 पुनर्वसन सदनिका पूर्णत्वास येणार आहेत.

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यांत उभारलेल्या इमारत क्रमांक 1 मधील डी व ई विंगमधील 556 सदनिकांचा ताबा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी देण्यात येत आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास, मुंबई उपनगराचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई उपनगराचे पालकमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर उपस्थित राहणार आहेत.

माटुंगा पश्चिम येथील यशवंत नाट्य मंदिर येथे सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपल्या घराची चावी स्वीकारण्यापूर्वी अनेक रहिवाशांनी एक दिवस अगोदरच तिरंगी प्रकाश योजनेत न्हाऊन निघालेला आपला टॉवर पाहिला. तळमजल्यावर लागलेल्या फलकावर आपले नाव पाहिले आणि या टॉवरसमोर उभे राहून एक सेल्फी तर काढावाच लागतो... तोही काढला. सेल्फी काढून झाल्यानंतर आपला आनंद व्यक्त करत पुष्पा काळे म्हणाल्या, अशा प्रकारच्या घराचा स्वप्नातही विचार केला नव्हता, इतके चांगले घर मिळाले आहे.

50 वर्षे तिथे राहिलो

जुन्या बीडीडी चाळीतील आठवणी जागवताना पुष्पा काळे यांनी सांगितले की, बीडीडी चाळीतील घर अतिशय लहान होते. त्याकाळी सासूबाईंच्या वडिलांनी ही जागा घेतली. बीडीडी चाळीच्या बांधकामात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. 50 वर्षे आमचे कुटुंब तेथे राहिले. इंग्रजांच्या काळात 1942 मध्ये मुंबईतील बीडीडी चाळीचे काम सुरु झाले. त्यावेळी चाळीमध्ये पाण्याची समस्या तर होतीच, पण कमी जागेत मोठ्या कुटुंबाला राहताना अनेक अडचणी आल्या. शेजारी खूप चांगले होते. गरजेला एकमेकांना मदतीसाठी धावून यायचे ते दिवस कधीच न विसरता येणारे आहेत, असेही पुष्पा काळे म्हणाल्या.

1 ऑगस्ट 2021 रोजी बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ झाला होता. पुष्पा काळे बोलताना म्हणाल्या की, नवीन घरात नवीन शेजारी असणार आहेत. सासूबाईंच्या वडिलांमुळे हे दिवस पाहायला मिळत आहेत. काळे कुटुंबाची तिसरी पिढी आता नवीन घरात राहायला जाणार आहे. आमचा फ्लॅट 28 व्या मजल्यावर आहे. 15 ऑगस्टला आम्ही नवीन घरात राहायला जाणार आहोत. तेव्हा माझा वाढदिवस असतो. त्यामुळे उत्सुकता आहे, असेही काळे या वेळी म्हणाल्या.

15 ऑगस्टला काळे कुटुंबाप्रमाणेच 160 कुटुंबे पुनर्वसित इमारतीमध्ये रहायला जाणार आहेत. जुन्या बीडीडी चाळीतील चाळ क्र. 30, 31 मधील 160 कुटुंबांना या पुनर्विकास इमारतीमधील मजला क्र 20 ते 40 मजल्यांमध्ये सदनिका मिळाल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT