BDD Chawl Water Supply Pudhari
मुंबई

BDD Chawl Water Supply: चाळीत असताना ३ तास पाणी; आता टॉवरमध्ये केवळ ४० मिनिटे

बीडीडी चाळींच्या पुनर्विकसित इमारतींचा पाणीप्रश्न गंभीर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: पिढ्यानपिढ्या लहान घरात राहिल्यानंतर अखेर बीडीडी चाळवासियांना उंच टॉवरमध्ये मोठे घर मिळाले; मात्र या टॉवरने त्यांचे पाणीसुख हिरावले आहे. चाळीत राहात असताना सकाळी ३ तास पाणी यायचे.

पुनर्विकसित टॉवरमध्ये राहायला आल्यापासून केवळ सकाळी २० मिनिटे आणि संध्याकाळी २० मिनिटे पाणी मिळत असल्याची तक्रार टॉवर ७ चे रहिवासी करत आहेत. नायगाव बीडीडी चाळींच्या पुनर्विकसित इमारतींतील घरांचा ताबा रहिवाशांना २ महिन्यांपूर्वीच मिळाला. चाळीत राहात असताना सकाळी ७ ते १० असे ३ तास पाणी यायचे.

टॉवरमध्ये राहायला आल्यानंतर २४ तास पाणीपुरवठा पाहून रहिवासी सुखावले होते; मात्र पुढील महिन्याभरातच त्यांना पाण्याची कमतरता भासू लागली. आता सकाळी २० मिनिटे आणि संध्याकाळी २० मिनिटे असे केवळ ४० मिनिटेच पाणी येते.

पाण्याच्या कमतरतेबाबत म्हाडाकडे वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटलेला नाही. रहिवासी घरात टाक्यांमध्ये पाणी साठवत असल्याने पाण्याची कमतरता भासत असल्याचे म्हाडाचे अधिकारी सांगतात; परंतु; म्हाडाने टाक्यांची जोडणी तोडल्यानंतरही पाणी येत नसल्याचे रहिवासी सांगतात.

पाणी पुरवठा वाहिन्यांना कुठे गळती असल्यास त्याचा शोध घेण्याची मागणी रहिवासी करत आहेत. बुधवारी टॉवर ७च्या रहिवाशांनी एकत्र येत एल ॲण्ड टी कंपनीच्या विक्री घटकातील इमारतींचे काम सुरू असलेल्या ठिकाणी मोर्चा काढला. १५ मिनिटे काम थांबवून म्हाडा अधिकाऱ्यांना भेटण्याची विनंती केली.

रहिवाशांचे म्हणणे...

अगोदर कोणीही राहात नसताना ८ टॉवर्ससाठी ८ लाख लीटर पाण्याचा पुरवठा पालिका करत होती. हे पाणी चुकून पाठवले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रहिवासी राहायला आल्यानंतर पाण्याचा पुरवठा ४.५ लाख लीटरवर आला.

टॉवर क्रमांक ७ येथे १७८ सदनिका आहेत. सध्या १५० सदनिकांमध्ये रहिवासी वास्तव्यास आहेत. इमारतीच्या वर ४० हजार लीटरची आणि तळाला ६५ हजार लीटरची टाकी आहे. २० मिनिटांत पूर्ण टाकी रिकामी होते.

दोन स्वच्छतागृह आणि एक स्वयंपाकघर आहे. तसेच अनेक घरांमध्ये एकत्र कुटुंबे राहातात. म्हाडा, पालिका मात्र पाणी देताना प्रत्येकी ९० लीटर याप्रमाणे केवळ ५ माणसांचे पाणी देते. त्यामुळे पाणी पुरत नाही. प्रत्येक घरात प्रत्येकी अडीचशे लीटरच्या दोन टाक्या लावण्याची परवानगी द्यावी. तसेच पाणी पुरवठा व्यवस्थेची सखोल तपासणी करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT