Digital Arrest Scam Pudhari
मुंबई

Mumbai Digital Arrest Scam: ‘डिजिटल अरेस्ट’चा बनाव अन् बनावट ईडी नोटीस! बीएआरसीच्या निवृत्त कर्मचाऱ्याला २४.८० लाखांचा गंडा

सीआयडी अधिकारी असल्याचे भासवून मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी; बनावट ईडी नोटीस दाखवून दोन खात्यांत पैसे वर्ग करण्यास भाग पाडले

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: सीआयडी अधिकारी असल्याचे भासवून मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत सायबर भामट्यांनी बीएआरसीच्या ६१ वर्षीय विनायक बाबुराव गायकवाड या निवृत्त वरिष्ठ तंत्रज्ञाला २४ लाख ८० हजार रुपयांचा गंडा घातला.

व्हॉट्सॲप कॉलवरून आरोपींनी त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये असल्याचा बनाव केला. बनावट ईडी नोटीस तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे ओळखपत्र पाठवून दहशत निर्माण केली व दोन बँक खात्यांमध्ये पैसे वर्ग करण्यास भाग पाडले. या प्रकरणी पूर्व विभाग सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार हे अणुशक्तिनगर येथील बीएआरसी वसाहतीत कुटुंबासह राहतात. १० सप्टेंबरला त्यांना अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप व्हॉइस कॉल आला. समोरील व्यक्तीने आपण ‘संदीप राव’ असून सीआयडीमधून बोलत असल्याचे सांगितले.

गायकवाड यांच्या नावावर सिमकार्ड काढण्यात आले असून, नाशिकमधील कॅनरा बँकेच्या खात्यातून दोन कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा दावा आरोपीने केला. दोन वर्षांपासून नाशिकला गेलो नसल्याचे सांगितल्यानंतरही आरोपींनी एका आरोपीने त्यांचे नाव घेतल्याचे सांगत त्यांना घाबरवले.

मुंबई पोलिसांचा लोगो, बनावट अधिकारी

यानंतर आरोपींनी दुसऱ्या व्यक्तीला व्हिडिओ कॉलवर जोडले. त्याने पार्श्वभूमीला मुंबई पोलिसांचा लोगो लावून आपण पोलिस अधिकारी असल्याचे भासवले. गायकवाड यांच्याविरोधात अटक वॉरंट निघाल्याचे सांगून तपासात सहकार्य करण्यास भाग पाडले.

१२ ते १५ सप्टेंबरदरम्यान गायकवाड यांना व्हॉट्सॲप कॉलवर ठेवण्यात आले. घराबाहेर न पडणे, कोणाशीही संपर्क न साधणे व आपल्या हालचालींची माहिती न देणे, अशा सूचना देण्यात आल्या.

पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी गायकवाड यांना आपण आरोपातून मुक्त झाल्याचे सांगितले. अधिकृत आदेश व्हॉट्सॲपवर पाठवला जाईल, असेही सांगण्यात आले. मात्र, आदेश न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

‘प्रकरण मिटवण्यासाठी’ २४.८० लाखांची मागणी

n १६ सप्टेंबरला आरोपींनी चौकशी आणखी दोन-तीन तास सुरू राहणार असल्याचे सांगत फोन चार्ज ठेवण्यास सांगितले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या व्यक्तीने गायकवाड यांच्याकडे २४.८० लाख रुपयांची मागणी केली.

ही रक्कम भरल्यास प्रकरणातून बाहेर पडता येईल, असे सांगण्यात आले. आरोपींनी दिलेल्या खात्यांमध्ये गायकवाड यांनी पैसे वर्ग केले. त्यापैकी खाती ‘लाइफलाइन अल्कलाइन’ आणि ‘ग्राम कन्स्ट्रक्शन ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड’ या नावावर असल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT