Baramati Bypoll News Pudhari
मुंबई

Baramati Bypoll News: सुनेत्रा पवारांचा पाठिंब्यासाठी उद्धव ठाकरेंना फोन

उद्धव ठाकरेच या पाठिंब्याबाबत निर्णय घेतील, असे सूचक भाष्य मात्र राऊत यांनी केले.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देण्याचे संकेत काँग्रेसने दिले असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक असल्याचे समजते.

सोमवारी उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शनिवारी सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून चर्चा केल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

मात्र, त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली आणि त्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी कोणता निर्णय घेतला यासंदर्भात ते स्वत: माहिती देतील,असे राऊत म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि अगदी जवळचे सहकारी होते. त्यांचे भावनिक नाते होते. त्यामुळे उद्धव ठाकरेच या पाठिंब्याबाबत निर्णय घेतील, असे सूचक भाष्य मात्र राऊत यांनी केले.

काँग्रेस उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार

काँग्रेस हा देशातील मोठा पक्ष आहे. बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा मित्रपक्ष म्हणून काँग्रेस उद्धव ठाकरेंशी चर्चा करेल. आघाडी म्हणून एकमेकांशी चर्चा केल्यानंतरच त्यातून निर्णय बाहेर येईल, असे राऊत म्हणाले. परंतु, भाजपसोबत असलेल्या पक्षाला मदत होऊ नये, अशी काँग्रेसची भूमिका असू शकते, मात्र, यासंदर्भात चर्चा करून तोडगा काढू, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT