मुंबई : 30 वर्षांपूर्वीच्या बँक घोटाळ्यात 98 वर्षीय अंथरुणाला खिळलेल्या कर्करोगग्रस्त वृद्धाला दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. वृद्ध आरोपीची वैद्यकीय स्थिती अत्यंत गंभीर आहे. मात्र कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील सहभागाचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने कर्करोगग्रस्ताला दिलासा नाकारला.
कर्करोगग्रस्त व न्यूरोकॉग्निटिव्ह डिसऑर्डरने त्रस्त असलेल्या डॉ. मोरेश्वर पटवर्धन यांनी 30 वर्षांपूर्वीच्या 11.89 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात दोषमुक्त करण्याची विनंती करीत विशेष न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्यांच्याविरुद्ध घोटाळ्याचा कट रचणे आणि गुन्हेगारी विश्वासघात अशाप्रकारे गंभीर आरोप आहेत. डॉ. मोरेश्वर पटवर्धन हे बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष आहेत.
न्यायालयाने डॉ. मोरेश्वर पटवर्धन यांच्यावरील खटला ते निरोगी होत नाहीत आणि खटल्यासाठी योग्य असल्याचे समजत नाहीत, तोपर्यंत पुढे ढकलला आहे. कायमस्वरूपी शारीरिक आणि मानसिक असमर्थतेच्या कारणावरून खटल्यातून मुक्तता मिळावी, अशी विनंती डॉ. पटवर्धन यांनी केली होती. त्यांच्या याचिकेवर विशेष न्यायाधीश बी.वाय. फड यांच्या समोर सुनावणी झाली.
यावेळी ॲड. अमित घरटे आणि सूरज सुळंबे यांनी बाजू मांडली. 98 वर्षीय वृद्ध पटवर्धन हे कर्करोगाने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यांना न्यूरोकॉग्निटिव्ह डिसऑर्डर आणि दृष्टी कायमची नष्ट होणे यांसारख्या अपरिवर्तनीय वैद्यकीय आजाराने ग्रासले आहे, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. मात्र घोटाळ्यातील आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता विशेष न्यायालयाने पटवर्धन यांना घोटाळ्याच्या आरोपांतून दोषमुक्त करण्यास स्पष्ट नकार दिला.11.89 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात सीबीआयने सुरुवातीला 29 आरोपींना अटक केली होती.