मुंबई : महाराष्ट्रातील बंजारा (लमाण) समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती वर्गाचा आरक्षणाचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील युवक सचिन एकनाथ चव्हाण व देवचंद गणपत राठोड यांनी अंबाताल (ता.कन्नड) ते मुंबई अशी पदयात्रा काढून सरकारचे लक्ष वेधले. रविवारी हे दोघे मुंबईत आले. सोमवारी या दोघांनी आझाद मैदानात ही मागणी केली.
बंजारा समाजाला हैद्राबाद स्टेट गॅझेटियर (1920)नुसार अनुसुचित जमाती वर्ग आरक्षणाचा दर्जा द्यावा,या मागणीसाठी 11 सप्टेंबर 2025 पासून चव्हाण व राठोड या दोघांनी पदयात्रेला अंबाताल येथून सुरुवात केली. येवला, निफाड, नाशिक, इगतपुरी, शहापू, ठाणेमार्गे ते मुंबईत आले. मराठवाडा प्रदेश 1948पर्यंत निजाम शासित हैद्राबाद राज्याचा भाग होता. त्या काळातील हैद्राबाद गॅझेटियर 1920 मध्ये लांबडा/बंजारा (सुगळी) समाजाचा स्पष्ट उल्लेख जमाती म्हणुन केला आहे.
1920 च्या गॅझेट मधील उतारा मधील पुराव्यानुसार समाज प्रशासकीय नोंदीनुसार आदिवासी समाजामध्ये आहे. शासनाने मराठा समाज बांधवांना 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार हैद्राबाद गॅझेटियर लागु केले. शासनस्तरावर हैद्राबाद गॅझेटियर अधिकृतपणे स्विकारले व अंमलात आले असल्यामुळे त्याचा आधार घेऊन महाराष्ट्रातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटप्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून त्यांना या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ द्यावा. या मागणीची अंमलबजावणी करावी, यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे, असे सचिन चव्हाण यांनी सांगितले.