मुंबई : राज्यातील अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या घटताना दिसत असली, तरी एसएनडीटी महिला विद्यापीठाने गेल्या चार वर्षांत मुलींच्या प्रवेशाचा नवा उच्चांक गाठला आहे. केवळ मुंबईतच नव्हे तर संलग्न महाविद्यालयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राज्यातील तसेच मुंबईतील मुलींनी एसएनडीटीला प्राधान्य दिले आहे.
देशातील पहिले महिला विद्यापीठ म्हणून 110 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या एसएनडीटीने शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी नियमित आणि दूरस्थ शिक्षणाची दारे खुली केली आहेत. विद्यापीठाच्या 37 विभागांसह 13 उच्च शिक्षण संस्था आणि 384 संलग्न महाविद्यालये कार्यरत असून सात राज्यांत त्याचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे.
2021-22 या शैक्षणिक वर्षात विद्यापीठात 48 हजार 37 मुली शिकत होत्या. त्यानंतर प्रत्येक वर्षी प्रवेशसंख्या वाढत गेली आणि 2024-25 मध्ये ती 84 हजार 331 पर्यंत पोहोचली. यंदाच्या 2025-26 शैक्षणिक वर्षात प्रवेशसंख्या 90 हजारांच्या पुढे गेल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या पुढाकारामुळे व्यावसायिक व पारंपरिक अभ्यासक्रमासाठी शुल्क प्रतिपूर्तीची योजना राबवली जात आहे. त्यामुळे एसएनडीटीमध्ये प्रवेशसंख्या दुपटीहून अधिक वाढली आहे.