मुंबई : मुंबई महापालिकेच्या खार एच-पश्चिम विभागातील एस. व्ही. रोड व के. सी. मार्ग येथे मोडकळीस आलेल्या पर्जन्य जलवाहिन्या बदलण्यासह नवीन पर्जन्य जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे वांद्रे पश्चिमेकडील नागरिकांची पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यापासून सुटका होणार आहे.
वांद्रे पश्चिमेला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत असल्यामुळे संपूर्ण परिसरातील जनजीवन विस्कळीत होते. एस.व्ही. रोड व के.सी. मार्ग येथे वारंवार पाणी तुंबत असल्याच्या शेकडो तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या होत्या. याकडे स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी आणि विभाग कार्यालयाकडून वारंवार लक्ष वेधण्यात येत होते.
अखेर याची दखल महापालिका आयुक्तांनी घेतल्यामुळे पर्जन्य जलवाहिन्या खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांसमवेत स्थळ पाहणी केली. या पाहणी दरम्यान अनेक ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्या मोडकळीस आल्याचे दिसून आले. काही ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्या अस्तित्वात नसल्यामुळे या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पावसाचे पाणी तुंबून राहत असल्याचे निदर्शनास आले.
अखेर या परिसरातील पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी अस्तित्वात असलेली यंत्रणा अपुरी असल्यामुळे सदर पर्जन्य जलवाहिन्यांची रूंदी 1.2 मी. वाढवण्यासह नवीन पर्जन्य जलवाहिन्या टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पाण्याचा निचरा जलद गतीने होऊन पावसाळ्यात पाणी साचण्याच्या प्रकारास आळा बसण्यात मदत होईल, असा दावा पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या वरिष्ठ अभियंत्याने केला आहे.
कंत्राटदाराची नियुक्ती
पर्जन्य जलवाहिन्यांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या कामाला येत्या दहा ते 15 दिवसात सुरुवात होणार असून या कामासाठी 7 कोटी 15 लाख 78 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.