मुंबई : वांद्रे रेक्लमेशन येथील प्रसिद्ध नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानाचे कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रुपांतर करण्याच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावाला मुंबई फुटबॉल असोसिएशनने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर गुरुवारी प्रभारी मुख्य न्यायमूर्तींचे खंडपीठ तातडीने सुनावणी घेणार आहे.
मुंबई महापालिका प्रशासन 'सुधारित विकास योजना २०३४' अंतर्गत फूटबाॅल मैदानाचा वापर 'खेळाचे मैदान आणि खुली जागा' वरून 'कन्व्हेन्शन कॉम्प्लेक्स/प्रदर्शनी केंद्र' असा बदलण्याचा प्रयत्न करत आहे. पालिकेच्या प्रस्तावाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
असोसिएशनतर्फे ज्येष्ठ वकील झाल अंध्यारुजिना यांनी बुधवारी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गाैतम अंखड यांच्या खंडपीठासमोर याचिका सादर केली आणि तातडीच्या सुनावणीसाठी विनंती केली. महापालिकेने घाईघाईने प्रस्तावाला मंजुरी दिल्याचा आरोप असोसिएशनतर्फे करण्यात आला. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी तातडीने गुरुवारी घेण्याचे निश्चित केले.
पालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारची नोटीस, जनसुनावणी, भागधारकांशी चर्चा किंवा व्यवहार्यता अभ्यास न करताच मैदानाचे कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतल्याचे याचिकेत म्हटले आहे. तसेच न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत मैदानावरील क्रीडा पायाभूत सुविधा हटवण्यास किंवा तिथे कोणत्याही बांधकामाला तात्पुरती स्थगिती देण्यात यावी, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.