मुंबई : उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांवरील बंदी कायम ठेवल्याने जैन समाज अधिक आक्रमक झाला आहे. न्यायालयाने मनाई करूनदेखील जैन समाजातील काही व्यक्तींनी दादरमधील कबुतरखान्याजवळ कबुतरांना धान्य टाकले होते. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे समाजाने 13 तारखेपासून कबुतरखाना बंद करण्याच्या निर्णयाविरोधात उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी गरज पडल्यास हातात शस्त्र घेऊ, असा इशारा दिला आहे.
निलेशचंद्र विजय म्हणाले की, आमचे पर्युषण पर्व संपल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. आम्ही शांत बसणार नाही. 13 तारखेला आम्ही उपोषण सुरू करू. देशभरातील जैन बांधव आंदोलनासाठी इथे येतील. जीव दया आमच्या धर्मात आहे, जैन धर्माला का लक्ष्य केले जात आहे? असा प्रश्न विचारत देशातील 10 लाख जैन बांधव इकडे उपोषणाला बसतील, असा इशारा निलेशचंद्र विजय यांनी दिला.
ते म्हणाले, दारू आणि कोंबड्या खाऊन किती लोक मरतात, हेही दाखवावे. आम्ही पालिकेकडे कबुतरांना खाद्य द्यायला परवानगी मागितली आहे. मुंगीपासून ते हत्तीपर्यंत कोणताही जीव मरता कामा नये, हे आमच्या धर्मात लिहिले आहे.
दरम्यान शिंदे गटाच्या नेत्या अॅड. मनीषा कायंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मनीषा कायंदे म्हणाल्या की, धर्मगुरू मार्गदर्शक असतात, ते आमचा एकेरी उल्लेख करतात. आम्ही विधान परिषदेवर आहोत, आम्ही कायदे मंडळामध्ये आहोत. आमच्याबाबत असे बोलणे बरोबर नाही. ज्यांना कबुतरे आवडतात त्यांनी ती घरी पाळावीत. सार्वजनिक ठिकाणी याचा त्रास नको. या देशात पोलीस, न्यायव्यवस्था आहे की नाही ? खरे तर चार दिवसाआधी कबुतरखान्यांवरील बंदी न उठल्यास वेळप्रसंगी शस्त्र हातात घेऊ. मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले होते की, या प्रकरणात जैन गुरु नव्हते. पण आता तेच धर्मगुरू या प्रकरणी आंदोलन करणार असल्याचं म्हणत आहेत. दादरमधील कबुतरखाना हा माझा वैयक्तिक प्रश्न नाही, तर मुंबईत दोन कोटी लोक राहतात, त्यांचा हा विषय आहे, असेही मनीषा कायंदे म्हणाल्या.
कबुतरखान्यावर येताना चाकू-सुरे, हत्यारे काढता. या देशांमध्ये पोलीस आणि न्यायव्यवस्था आहे का नाही? असा प्रश्न मनिषा कायंदे यांनी केला. आपल्या देशामध्ये न्यायव्यवस्था आहे. नागपंचमीला नागांना दूध पाजण्याची परंपरा होती, ती बंद केली. आता मशिदीवरचे अनधिकृत भोंगे बंद केले जात आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई व्हायला हवी, असं मनिषा कायंदे म्हणाल्या.