Fraud Pudhari
मुंबई

Baliram Hire Architecture College fraud : फसवणूकप्रकरणी वांद्य्रातील बळीराम हिरे महाविद्यालयाचे विद्यार्थी पोलिसांत

बांद्रा (पूर्व) येथील बळीराम हिरे आर्किटेक्चर कॉलेजमध्ये ‌‘स्कूल ऑफ डिझाईन‌’च्या नावाखाली विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : बांद्रा (पूर्व) येथील बळीराम हिरे आर्किटेक्चर कॉलेजमध्ये ‌‘स्कूल ऑफ डिझाईन‌’च्या नावाखाली विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संतप्त विद्यार्थ्यांनी थेट खेरवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.

2021 पासून आतापर्यंतच्या पाच बॅचमधील 125 हून अधिक विद्यार्थी या प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत. आता पोलिसांनी यासंदर्भात मार्ग काढावा, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.

विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणतीही अधिकृत परवानगी न घेता कॉलेजमध्ये ‌‘स्कूल ऑफ डिझाईन‌’ सुरू करण्यात आले आणि बीव्होक/बीएससी इंटिरिअर डिझाईन अभ्यासक्रम चालविण्यात आला. प्रवेशावेळी संगाई युनिव्हर्सिटीशी संलग्न असल्याचे सांगण्यात आले; मात्र नंतर हीच युनिव्हर्सिटी अमान्य झाल्याचे उघड झाले. ही माहिती विद्यार्थ्यांपासून जाणीवपूर्वक लपवण्यात आल्याचा आरोप आहे.

पहिल्या बॅचने अभ्यासक्रम पूर्ण करूनही त्यांना मार्कशीट मिळाली नाही. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सिकीम इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या नावाने मार्कशीट देण्यात आली; मात्र त्यावर ना बारकोड, ना क्यूआर कोड त्यामुळे या मार्कशीटच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत, अशी माहितीही विद्यार्थ्यांनी दिली.

विद्यार्थ्यांकडून दरवर्षी तब्बल 90 हजार रुपये फी आकारण्यात आली, मात्र फी फिक्सेशन कमिटीची कोणतीही मंजुरी घेण्यात आलेली नव्हती. विविध वेळी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटींची नावे सांगून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला असून तसे निवेदनही पोलिसांना दिले आहे.

या सर्व प्रकरणात शैक्षणिक फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार आणि मानसिक छळ झाल्याचा ठपका ठेवत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य प्रमुख संघटक संतोष गांगुर्डे यांनी या प्रकरणात कडक कारवाईची मागणी केली आहे.

  • दोन वर्षे उलटूनही पदवी मिळालेली नाही. प्रमाणपत्र, प्लेसमेंट किंवा कॅम्पस इंटरव्ह्यू यांची कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. उलट प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांवर दबाव आणणे, धमक्या देणे आणि कॉलेजमध्ये बाउन्सर ठेवून प्रवेश रोखणे, असे प्रकारही घडल्याचा आरोप आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT