चौथीच्या पुस्तकात रामानुजन यांच्या निधनाची तारीख चुकीची pudhari photo
मुंबई

Ramanujan Death Date : चौथीच्या पुस्तकात रामानुजन यांच्या निधनाची तारीख चुकीची

बालभारती करणार पुढील आवृत्तीत मुद्रणदोषाची दुरुस्ती

पुढारी वृत्तसेवा

मुंबई / पुणे : बालभारतीच्या इयत्ता चौथीच्या पुस्तकात गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या निधनाची तारीख चुकीने २७एप्रिल १९२० अशी छापली गेली आहे. त्याऐवजी २६ एप्रिल १९२० ही योग्य तारीख असून हा मुद्रणदोष पुढील आवृत्तीत दुरुस्त करण्यात येणार आहे.

त्याबरोबर या पाठ्यपुस्तकातील काही मुद्रणदोषांबाबत संबंधित त्रुटींची दखल घेण्यात आली असून, त्या पुढील आवृत्तीत दुरुस्त करण्यात येणार आहे. संबंधित बदलांचा व्हिडीओ तातडीने क्यूआर कोडद्वारे उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीने स्पष्ट केले आहे.

इयत्ता चौथीचे गणित पाठ्यपुस्तक एकूण १० माध्यमांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. त्यापैकी मराठी व इंग्रजी माध्यमातील काही मुद्रणदोष निदर्शनास आले आहेत. मराठी व इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक १०९ वर भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या निधनाची तारीख चुकीने २७ एप्रिल १९२० अशी छापली गेली आहे. त्याऐवजी २६ एप्रिल १९२० ही योग्य तारीख असून, हा मुद्रणदोष पुढील आवृत्तीत दुरुस्त करण्यात येणार आहे.

मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक ५५ वरील स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक १ मधील 'जोड्या लावा' या भागात '१००० ग्रॅमपेक्षा जास्त' असे छापले गेले आहे. त्याऐवजी '१००० किलोग्रॅमपेक्षा जास्त' असे असणे अपेक्षित होते. ही त्रुटी केवळ मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात असून, तीही पुढील आवृत्तीत दुरुस्त करण्यात येणार आहे.

इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक ७७ वर खालून चौथ्या ओळीत 'of' ऐवजी ' of ₹1.' तसेच खालून तिसऱ्या ओळीत '₹1.49 rupees' ऐवजी '49 rupees' असे असणे अपेक्षित होते. ही चूकही केवळ इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात असून, पुढील आवृत्तीत आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येणार आहे.

क्यूआर कोडवर व्हिडीओद्वारे सुधारित माहिती

विद्यार्थी आणि शिक्षकांना योग्य माहिती त्वरित उपलब्ध व्हावी, यासाठी संबंधित सुधारित बदलांचा व्हिडीओ पाठ्यपुस्तकातील क्यूआर कोडद्वारे तातडीने अपलोड करण्यात येणार असल्याचे बालभारतीमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT