

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नव्या पिढीची बदलती जीवनशैली आणि इंग्रजी भाषेचे वाढते वर्चस्व यामुळे मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीची ओळख नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे गरजेचे आहे. विदेशात राहणाऱ्या मराठी माणसांसाठीच नव्हे, तर महाराष्ट्रातील मराठी मनही मराठी भाषेपासून दुरावत असल्याने, कुसुमाग्रज मराठी विचार मंचने एक महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे.
त्यानुसार मराठी भाषा आणि कुसुमाग्रज यांच्या साहित्यिक व सांस्कृतिक वारशाची ओळख तब्बल २० भारतीय आणि विदेशी भाषांमधून करून दिली जाणार आहे. मंचाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांमध्ये मराठी वाचन आणि लेखनाची गोडी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
विशेषतः इयत्ता चौथी ते सातवीतील विद्यार्थ्यांसाठी कुसुमाग्रज यांच्या जीवनकार्याची, साहित्याची आणि मराठी संस्कृतीची माहिती देणारी सर्वसमावेशक पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेच्या आधारे विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते आणि यशस्वी विद्यार्थ्यांना मराठीचे उपासक ही पदवी प्रदान केली जाते.
या उपक्रमामागील प्रमुख उद्देश म्हणजे जगभरातील नव्या पिढीला मराठी भाषा, साहित्य आणि कुसुमाग्रज यांच्या कार्याची ओळख करून देणे. परदेशात वास्तव्यास असलेल्या मराठी कुटुंबांतील मुलांनाही आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा परिचय व्हावा, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मंचाचे मत आहे. दरम्यान, मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मंचाचे अध्यक्ष सतीश बोरा, सचिव सुभाष सबनिस, उपाध्यक्ष दिलीप बारबकर, खजिनदार जयप्रकाश मुथा यांनी केले आहे.
पाच हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
गेल्या दोन वर्षांत जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबाबत आत्मीयता निर्माण होत असून मराठी साहित्यिक, कवी, लेखक, शिक्षणतज्ज्ञ आणि सांस्कृतिक परंपरांविषयीची माहितीही त्यांना मिळत आहे.
२० भाषांमध्ये पुस्तिका
या उपक्रमाला आणखी व्यापक स्वरूप देत संस्थेने ही पुस्तिका विविध भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्रजी, जपानी, फ्रेंच, चायनीज, जर्मन, स्पॅनिश, रशियन यांसह हिंदी, उर्दू, गुजराती, बंगाली, कन्नड, तेलुगू, मल्याळम, तमिळ, ओडिया, पंजाबी, आसामी आदी भाषांमध्ये भाषांतर करून ती प्रसिद्ध केली जाणार आहे. याशिवाय ब्रेल लिपीतही ही पुस्तिका प्रकाशित करण्याची तयारी सुरू आहे.
निधी उपलब्धतेनुसार आणि इतर प्रकाशकांच्या सहाय्याने कुसुमाग्रजांचे साहित्य विविध भाषेत भाषांतर करण्याचा संस्थेचा मनोदय असून, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कुसुमाग्रज मराठी - सतीश बोरा, अध्यक्ष विचार मंच