मुंबई : राज्यातील बी.फार्मसी (औषधनिर्माणशास्त्र) प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत यंदा प्रवेश प्रक्रिया कित्येक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाली होती. मात्र, नियोजित तारखांनंतरही राज्य सरकारच्या सूचनेनंतर वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मान्यता प्रक्रियेतील विलंब, तांत्रिक त्रुटी आणि फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडून संस्थांना मिळणार्या मान्यतेमुळे वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. परिणामी, शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होण्याऐवजी दोन ते तीन महिने उशिरा सुरू होत आहे.
राज्यातील 54 हजार 921 विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी 15 दिवसापूर्वीच जाहीर झाली होती. सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार 25 ते 27 सप्टेंबरदरम्यान पसंतीक्रम भरण्याची सुविधा होती. मात्र आता या वेळापत्रकात बदल केला आहे. विद्यार्थ्यांना 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान पसंतीक्रम भरता येईल. त्यानंतर पहिली प्रवेश यादी 29 सप्टेंबरला जाहीर होणार होती ती आता 3 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. यामुळे संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पुढे गेली असून, जे प्रवेश 12 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार होते, ते आता 17 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहेत.
संस्था मान्यता प्रक्रिया अजूनही सुरुच असल्याने प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र जे विद्यार्थी चार महिन्यांपासून प्रवेशाची वाट पहात आहेत, त्यांचा विचार कधी करणार, असा सवालही उपस्थित होत आहे.
गतवर्षी देखील बी.फार्मसी प्रवेशात अशीच अडचण निर्माण झाली होती. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रवेश रखडले होते. परिणामी 48 हजार 051 जागांपैकी फक्त 31 हजार 827 जागाच भरल्या गेल्या होत्या. यंदाही वेळापत्रक उशिरा जाहीर झाल्यामुळे तसाच प्रकार होण्याची भीती संस्थाचालक व्यक्त करत आहेत.