B.Pharm Syllabus Pudhari
मुंबई

B.Pharm Syllabus: जुन्याच अभ्यासक्रमानुसार पूर्ण करता येणार बी.फार्म; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

२०२५-२६पर्यंत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पीसीआयचा दिलासा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० नुसार भारतीय औषधनिर्माण परिषदेने (पीसीआय) तयार केलेला बी.फार्मचा सुधारित अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून लागू होणार असला, तरी २०२५-२६ किंवा त्यापूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण जुन्याच अभ्यासक्रमानुसार पूर्ण करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच बॅकलॉग विषय शिल्लक असतानाही विद्यार्थ्यांना पुढील सत्रात प्रवेश घेऊन नियमित वर्गांना उपस्थित राहता येणार आहे.

एनईपी २०२०च्या अनुषंगाने पीसीआयने बी.फार्मचा अभ्यासक्रम पूर्णपणे अद्ययावत केला असून, त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशीन लर्निंग, कौशल्यविकास, संशोधन, डिजिटल तंत्रज्ञान आणि आधुनिक औषधनिर्मिती प्रक्रियेवर विशेष भर देण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम निवड-आधारित श्रेयांक प्रणाली (सीबीसीएस)वर आधारित असून, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून देशभर लागू केला जाणार आहे.

मात्र, नवीन अभ्यासक्रम लागू होत असताना २०१६-१७ च्या अभ्यासक्रमानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी पीसीआयने विशेष तरतुदी जाहीर केल्या आहेत. त्यानुसार २०२५-२६ किंवा त्यापूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी लागू असलेल्या नियमांनुसारच संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून २०१६-१७ च्या जुन्या अभ्यासक्रमाअंतर्गत नवीन प्रवेश दिले जाणार नाहीत. मात्र, अपुरी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष वर्ग, नियमित वेळेव्यतिरिक्त अतिरिक्त अध्यापन तास, अभ्यासासाठीची रजा किंवा संस्थेने मंजूर केलेल्या इतर पर्यायी व्यवस्थांद्वारे आवश्यक उपस्थिती पूर्ण करण्याची संधी देण्यात येणार आहे.

याशिवाय, बॅकलॉग विषय प्रलंबित असले तरी विद्यार्थ्यांना पुढील सत्रात प्रवेश घेण्याची आणि वर्गांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बॅकलॉग कायम ठेवून आठव्या सत्रापर्यंत नियमित शिक्षण सुरू ठेवता येणार असून, त्यानंतर सर्व विषय पूर्ण करून पदवी मिळवता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT