नवी मुंबई : नवी मुंबईत गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहतुकीवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे.
पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच पाणी साचलेल्या रस्त्यांवरून वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नवी मुंबईत २४ तासांत सरासरी २१०.७६ मिमी पावसाची नोंद झाली असून १ जून ते ५ जुलैपर्यंत एकूण १०२०.२२ मिमी पाऊस झाला आहे. मोरबे धरणाच्या पातळीत वाढ झाली असून पातळी ७२.१५ मीटरवर (33.९६%) पोहचली आहे.
हवामान विभागानेही पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवी मुंबईतील वाशी सेक्टर-१५ मध्ये जोरदार वारा आणि खराब हवामानात रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कारवर अचानक झाड कोसळले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. ही दिलासादायक बाब आहे की घटनेवेळी गाडीत कोणीही नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
माहिती मिळताच संबंधित विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि झाड हटविण्याचे काम सुरू केले. सतत पडणारा पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे नवी मुंबईत झाडे पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून नागरिकांनी सावध राहून मोठ्या झाडाखाली वाहने उभी करू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. रस्त्यावरच झाड पडल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर-१ मधील शिवाजी महाराज चौकाजवळ एक मोठे झाड रस्त्यावर पडल्याने रस्ता पूर्णपणे ठप्प झाला.
झाडे उन्मळून पडल्याने दोन्ही बाजूने वाहनांची वाहतूक प्रभावित होऊन नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. घटनेची माहिती मिळताच संबंधित विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचले आणि झाडे हटविण्याचे काम सुरू केले. खराब हवामानात नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा व अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
उरणमधील न्हावा शेवा पोलीस ठाण्यात पावसाचे पाणी घुसले. उरण शहरासह संपूर्ण तालुक्यात शनिवारी व रविवारी जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे न्हावा शेवा पोलीस ठाण्यात पाणी शिरल्याने पोलीसांना कार्यालयीन कामकाज सोडून कार्यालयातील पाणी बाहेर काढण्याचे काम करावे लागले. उरण शहरात जोरदार पाऊस झाल्याने उरणमधील भेंडखळ, म्हातवली गावातील रहिवाशांच्या घरांत पुराचे पाणी शिरल्याने रहिवाशांची एकच तारांबळ उडाली.
उरणमधील ग्रामीण भागात पावसाचा जोर असल्याने अनेक सखल भागांत पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. काल शनिवारी ४ जुलै रोजी रात्री ८.१० च्या सुमारास बेलापूर शहाबाज गाव सेक्टर १९ अविघ्न को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्लॉट नंबर ११२३ A/- ११२५ या बिल्डिंगमधील पहिल्या माळ्यावरचा बाल्कनीचा स्लॅब पूर्णपणे खाली पडला होता.
नमुंमपा अग्निशमन विभागाने त्या ठिकाणी तत्परतेने पोहोचत बिल्डिंग मधील १७ फ्लॅट मधील लोकांना सुरक्षित बाहेर काढले. ती पाच माळ्यांची बिल्डिंग होती. एमएसईबीने घटनास्थळी येऊन पूर्ण बिल्डिंग मधील विद्युत पुरवठा बंद केला आहे. येथील काही रहिवाशांना महापालिकेमार्फत परिवहन बस मधून वारकरी भवन येथे हलविण्यात आले तर काही लोक आपल्या नातेवाईकांकडे गेले. बिल्डिंगच्या आत प्रवेश करु नये यासाठी दोन्ही गेटला लॉक केलेला आहे. घटनास्थळी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
२४ तासांतील पाऊस
बेलापूर ३०२.७८ मिमी
नेरुळ १५२ मिमी
वाशी १४१.८० मिमी
कोपरखैरणे १९९.२० मिमी
ऐरोली २४७.६० मिमी
दिघा २२१.२० मिमी
सरासरी २१०.७६ मिमी
एकूण पाऊस १ जून ते ५ जुलैपर्यंत १०२०.२२ मिमी
मोरबे धरण
आजचा पाऊस २७०.२ मिमी
एकूण पाऊस १ जून ते ५ जुलैपर्यंत ८७१.४ मिमी
पातळी ७२.१५ मीटर (३३.९६ %)
घटना
आगीची घटना-१
झाडे पडली -४०
स्लॅब कोसळले -१
फांदी पडणे -१
पाणी साचले -११