गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनी महापौर रितू तावडे यांना मंजुरी पत्र दिले. pudhari photo
मुंबई

Asiatic Lions Mumbai Zoo : मुंबईच्या राणीबागेत पुन्हा घुमणार आशियाई सिंहांची डरकाळी

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडून सामंजस्य कराराला हिरवा कंदील; मुंबईकरांना दिवाळीची अनोखी भेट!

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणीबागेत लवकरच आशियाई सिंहांचे आगमन होणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनी जुनागढ येथील साकरबाग प्राणिसंग्रहालय आणि मुंबई प्राणिसंग्रहालय यांच्यात सामंजस्य करार करण्याचे निर्देश गुजरात प्रशासनाला दिले आहेत.

मुंबईच्या राणीबागेत दोन नर आणि दोन मादी असे एकूण चार आशियाई सिंह आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना महापौर रितू तावडे यांनी दिवाळीची अनोखी भेट दिली आहे.

या प्रस्तावाला मंजुरी मिळावी, यासाठी महापौर रितू तावडे यांनी बुधवारी (४ नोव्हेंबर) गांधीनगर येथे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. ही भेट सकारात्मक ठरली असून, प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून दोन्ही प्राणिसंग्रहालयांमध्ये सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. लवकरच गुजरात सरकारकडून मुंबई महापालिकेला मंजुरीचे पत्र आणि सामंजस्य कराराचा मसुदा प्राप्त होणार आहे.

तातडीने कार्यवाहीसंदर्भात वनमंत्र्यांचे निर्देश

दरम्यान, महापौर तावडे यांनी गुजरातचे वन राज्यमंत्री प्रवीणकुमार माळी यांचीही भेट घेतली. मुंबई प्राणिसंग्रहालयाला आशियाई सिंह लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी वन विभागाला निर्देश देण्याची विनंती त्यांनी केली.

यावर वन राज्यमंत्र्यांनी महापौरांचे निवेदन स्वीकारून वन खात्याच्या प्रधान सचिवांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

तीन जोड्या माकडांच्या बदल्यात चार सिंह

  • जुनागढ येथील प्रसिद्ध साकरबाग प्राणिसंग्रहालयाकडून मुंबईला दोन नर आणि दोन मादी असे चार आशियाई सिंह देण्याचा प्रस्ताव आहे.

  • त्याबदल्यात मुंबई प्राणिसंग्रहालयाकडून तीन जोड्या टफ्टेड कॅपुचिन माकडे साकरबाग प्राणिसंग्रहालयाला देण्यात येणार आहेत.

  • या वन्यप्राणी देवाणघेवाणीला दोन्ही प्राणिसंग्रहालयांनी यापूर्वीच संमती दर्शविली आहे.

सिंहांसाठी अत्याधुनिक निवासस्थान सज्ज

विशेष म्हणजे, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या (सीझेडए) अंतिम मान्यतेनुसार राणीबागेत आशियाई सिंहांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक निवासस्थान तयार करण्यात आले आहे. त्यामुळे गुजरात सरकारची प्रशासकीय मंजुरी आणि सामंजस्य कराराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सिंहांच्या मुंबई आगमनाचा मार्ग अधिक सुकर होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT