पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांची मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आज (दि. १३) काढण्यात आले आहेत. सध्या ब्रिजेश सिंह मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी (CM Secretary Appointment) कार्यरत आहेत. त्यांच्य़ा जागी भिडे यांची बदली करण्यात आली आहे.
नवीन पदाचा कार्यभार ब्रिजेश सिंह यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा, तसेच पुढील आदेश येईपर्यंत आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभारही आपणाकडे ठेवावा, असे पत्रात म्हटले आहे. (Ashwini Bhide)
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची अतिरिक्त जबाबदारी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सोपवली होती. मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या देखरेखीसाठी २०१४ मध्ये मेट्रो महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर भिडे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. आरेमध्ये मेट्रो कारशेड बांधण्याच्या निर्णयामुळे शिवसेना आणि पर्यावरणप्रेमी संतप्त झाले होते. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भिडे यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली होती.