

कोलाड | पुढारी वृत्तसेवा
रोहा तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरुन गोवे गावाकडे जाणारा रस्ता ठेकेदाराच्या अडमुठेपणामुळे बंद करण्यात आला आहे. या मार्गावरून कोलाड नाक्यावर तसेच कोलाडकडून गोवे गावाकडे जाणारा मार्ग बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांसहित गोवे, पुई ग्रामस्थ यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे गोवे पुई ग्रामस्थ आक्रमक होत रस्त्यावर उतरले. विविध मागण्या पूर्ण झाल्याशिवाय महामार्गाचे काम करुन देणार नाही अशा संबंधित ठेकेदार याला इशारा देण्यात आला व महामार्गाचे काम बंद करण्यात आले.
यावेळी विभागीय अध्यक्ष नरेंद्र जाधव, गोवे ग्रामपंचायत सरपंच महेंद्र पोटफोडे, सदस्य नितीन जाधव,नरेंद्र पवार, गावाकमेटी अध्यक्ष बळीराम जाधव, उपाध्यक्ष सत्कार कापसे, सचिव श्रीधर गुजर, खजिनदार शंकर दहिंबेकर, सुरेश जाधव, प्रविण पवार,भरत जाधव, राजा जाधव, कमलाकर शिर्के, महादेव जाधव, नंदा वाफिलकर, नितीन वारकर, महेंद्र जाधव, पांडुरंग जाधव, हसन म्हसलाई, सुनिल दळवी, अशोक धामणसे, उल्हास पाटील, ठेकेदार, पाटबंधारे खात्याचे अधिकारी पोलिस अंमलदार नरेश पाटील, तसेच असंख्य गोवे व पुई ग्रामस्थ उपस्थित होते. महामार्ग 66 वरील चौपदरीकरणाच्या कामाला 17 वर्षे पूर्ण झाल्यानंतर कोलाड परिसरातील रस्ता करण्यासाठी ठेकेदाराला जाग आली आहे. परंतु गोवे गावाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच मुंबई गोवा हायवे वरून उन्हाळी भातशेतीला पाणीपुरवठा करणारा चेंबर तोडण्यात आला आहे. तसेच महामार्गासाठी संपादित करण्यात आलेली जमीन यांची मार्किंग केली नाही, या विविध मागण्यासाठी ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन करण्यात आले.
महामार्गांवरून गोवे गावाकडे जाणारा मार्ग खुला करुन देणे, संपादित केलेली जमिनींची मार्किंग करुन देणे,भातशेतीला पाणी पुरवठा करणारा चेंबर बांधून देणे किंवा इतर मार्गानी भातशेतीला पाणीपुरवठा करुन देणे. हे काम वेळेवर झाले नाही तर येथील शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल. ही कामे पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत चौपदरीकरणाचे काम करून देणार नाही.
-महेंद्र पोटफोडे, सरपंच,गोवे