मुंबई: महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचे जतन करण्यासाठी राज्य सरकारने लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार केला आहे. तमाशा, दशावतार, शाहिरी, खडीगंमत आणि संगीतबारी याबरोबर यापुढे ‘नमन खेळे’, ‘जाखडी’, ‘वहीगायन’ आणि ‘झाडीपट्टी’ या चार पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधानपरिषदेत केली.
लोककलांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी २००८ पासून तमाशा, दशावतार, शाहिरी, खडीगंमत आणि संगीतबारी या लोककलांना शासनाकडून अनुदान दिले जात आहे. आता या योजनेत नव्याने ‘नमन खेळे’, ‘जाखडी’, ‘वहीगायन’ आणि ‘झाडीपट्टी’ या लोककलांचाही समावेश करण्यात आला आहे.
झाडीपट्टी रंगभूमी ही पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील १३० वर्षांहून अधिक परंपरा असलेली वैशिष्ट्यपूर्ण लोकनाट्य परंपरा आहे. ‘वहीगायन’ ही उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रिय लोककला आहे. ‘नमन खेळे’ आणि ‘जाखडी’ या कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहेत.
या योजनेंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातील २० कलापथकांना प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदान दिले जाईल. १० लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे.
‘झाडीपट्टी’ : २० कलापथकांना एकूण १० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येईल.
‘वहीगायन’ : २० कलापथकांना एकूण १० लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल.
‘नमन खेळे’ : २० कलापथकांना एकूण १० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
‘जाखडी’ : २० कलापथकांना एकूण १० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येईल, असे शेलार यांनी सांगितले.