Farming Pudhari
मुंबई

Ashadhi Wari Farmers: पेरणी पांडुरंगाच्या हाती सोपवून वारकरी पंढरीकडे; पेरणी की वारी, भयंकर पेच

राज्यभरात सरासरी तीन टक्केच पेरणी

पुढारी वृत्तसेवा

स्वप्निल कुलकर्णी

मुंबई: यंदाची आषाढी वारी वारकरी बळीराजाची मोठी परीक्षा घेते आहे. घरची काळी माय पेरणीच्या प्रतीक्षेत. तिला निसर्गाने हिरवे लुगडे अजून नेसवलेले नाही; कारण बहुतांश महाराष्ट्रात पेरण्यांचाच पत्ता नाही.

वारीला निघण्याचा ठिकठिकाणचा मुहूर्त मात्र नजीक येत चाललेला. पेरणीशिवाय शेत सोडून वारीला निघावे की वारी सोडून पावसाची वाट पाहात बांधावर बसावे? पेरणी की वारी अशा पेचात पंढरीच्या वाटेवर दुडुदुडु धावणारी वारकऱ्यांची पावले जरूर अडखळली; थांबली मात्र नाहीत.

वारीचा असा पेच महाराष्ट्राने क्वचित अनुभवला आहे. एरव्ही दरवर्षी मृगाच्या पावसालाच पेरण्या होतात अन्‌ पंढरीकडे डोळे लावून बसलेल्या वारकऱ्याला कुठली ना कुठली पालखीच ‘रामकृष्ण हरी’ म्हणून साद घालते. पेरण्या करून, शेतशिवार तुडवूनही न दमलेली वारकरी बळीराजाची पावले पंढरीच्या वाटेवर भक्तीचा मळा फुलवू लागतात.

यंदाचे चित्र यापेक्षा वेगळे, विचित्र आहे. पंढरीकडे डोळे लावून बसलेल्या वारकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आहे आणि पावसाची प्रतीक्षा आहे. पेरणी कधी होणार, हा पावसाच्याच हाती असलेला सवाल आहे. जून महिना सरला. रोहिणी अन् मृग दोन्ही नक्षत्रे तशी कोरडीच गेली. मान्सून आला म्हणून मोठा गलबला झाला. तो पेरणी करण्यासारखा अजून बरसला मात्र नाही.

कृषी आयुक्त कार्यालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यात २२ जूनपर्यंत खरिपाची फक्त तीन टक्केच पेरणी झाली आहे. गतवर्षी राज्यात खरिपाची पेरणी १४३.५५ लाख हेक्टर झाली होती. यंदा जून महिना मावळतीला आला तरी याच पेरणीचे औत ४.९७ लाख हेक्टरच्या पुढे सरकलेले नाही.

नाशिक विभागात सर्वाधिक म्हणजे १.५८ लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण झाल्याचे दिसते. मात्र जूनच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरीपेक्षा खूपच कमी म्हणजे केवळ २६ टक्केच पाऊस झाल्याने २२ जूनपर्यंत राज्यभरातील पेरणीचे सरासरी प्रमाण जेमतेम तीन टक्के आहे.

सरासरी पेरणी- ३ टक्के

इथून पुढे पाऊस कधी जोर धरेल, ठाऊक नाही. शेतांची तहान कधी भागेल माहीत नाही. खरिपाच्या पेरण्या कधी होतील, सांगता येत नाही. शेतकऱ्यांच्या पारंपरिक समजुतीनुसार, सत्तावीस नक्षत्रांतून पावसाची नऊ नक्षत्रे कोरडी गेली, तर दुष्काळ पडतो. याउलट हीच नऊ नक्षत्रे व्यवस्थित बरसली, तर मात्र अन्नधान्याची संपन्नता येते. यंदा काय होणार, कुणीच सांगू शकत नाही.

ही सारी अडचण सांगण्याची एकच जागा आहे- ती म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग! मृग नक्षत्राचा पाऊस चांगला झाल्यास वीस जूनपूर्वी पेरण्या होतात. मृगाचा पाऊस चांगला झाल्यानंतर पुढील नक्षत्रांचा पाऊसही साधारणपणे समाधानकारक होतो आणि खरीप हंगाम चांगला जातो. यंदा मृग जवळपास कोरडाच गेला.

महाराष्ट्राच्या कृषीपरंपरेचा वारीवर मोठा प्रभाव आहे. विठ्ठल आणि त्याचे वारकरी भक्त यांच्यातील पावसाचे हे कनेक्शन अद्‌भुत आहे. आषाढी यात्रेत पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, विदर्भ, मराठवाड्यातील वारकरी पंढरपूरला येत असतात. मात्र यावर्षी पावसाने दडी मारल्याने या विभागातील पेरण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीला जाणारा शेतकरी पेरणीच्या चिंतेने व्याकुळ झाला आणि डोळ्यांत पाणी घेऊनच पंढरीकडे निघण्याची तयारी करू लागलेला दिसतो.

शेगावीच्या गजानन महाराजांच्या पालखीने कधीच प्रस्थान ठेवले. खान्देशातून संत मुक्ताई निघाल्याच आहेत. सात जुलै रोजी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे, तर आठ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होईल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून दरवर्षी पंढरीस जाणाऱ्या पालख्यांचे प्रस्थान सोहळे जाहीर झाले आहेत.

या पालख्यांची 'रामकृष्ण हरी' ही साद कानी पडली आणि वारकरीदेखील पेरणीसाठी म्हणून काही अडून बसलेला नाही. सारे काही पांडुरंगाच्या हवाली करून त्याच्या भेटीला तो निघालेला दिसतो. उलट गतवर्षीपेक्षा अधिक संख्येने तो यंदाच्या वारीत पावली खेळेल असे दिसते.

श्री. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदीच्या पालखीचे प्रस्थान ८ जुलै रोजी होईल. या दिंडीत गतवर्षी ५ लाख वारकरी होते. यंदाही तितकीच संख्या नोंदवली गेली आहे. श्री. संत तुकाराम महाराज संस्थान, देहूची दिंडी ७ जुलै रोजी निघेल. गतवर्षी तुकोबांच्या दिंडीत ३ लाख ८० हजार वारकऱ्यांनी नोंदणी केली होती.

यंदा ही संख्या ४ लाखांवर गेली आहे. श्री. संत एकनाथ महाराज संस्थान, पैठणच्या दिंडीत गतवर्षी २६ हजार वारकरी होते. यंदा ३० हजार वारकऱ्यांनी नोंदणी केली. नाथांची पालखी ७ जुलै रोजी प्रस्थान ठेवणार आहे. श्री. संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान, त्र्यंबकेश्वरची दिंडी २९ जून रोजी निघेल.

गतवर्षीच एक लाख वारकरी या दिंडीत होते. यंदा १ लाख २५ हजार संख्या झाली आहे. श्री. संत मुक्ताई देवस्थान, मुक्ताईनगरची दिंडी पंढरीकडे निघाली आहे. या दिंडीत मागच्या वर्षी ४ हजार वारकरी होते. यंदा ५ हजार वारकरी सहभागी आहेत. श्री. विठ्ठल-रखुमाई संस्थान, कौंडण्यपूरची दिंडी तीन हजार वारकऱ्यांसह पंढरीकडे निघाली आहे. या दिंडीत गतवर्षी अडीच हजार वारकरी होते.

या सर्व दिंड्या पंढरीकडे निघाल्या की ठिकठिकाणी त्यांना वारकऱ्यांची जोड मिळत जाते. भक्तीच्या उपनद्या चंद्रभागेच्या अथांग भक्तिसागराला जाऊन मिळाव्यात तसे हे वारकऱ्यांचे दिंडीला जाऊन मिळणे असते. ठिकठिकाणी होणाऱ्या अशा संगमातूनच २५ जुलै रोजी आषाढी एकादशीचा अनुपम्य सोहळा होईल. तोपर्यंत असेल मनात तर खुद्द पांडुरंग पेरणीची मूठ धरेल!

अनेकांच्या घरी परंपरागत वारी असते आणि ते वारी कधीही चुकवत नाहीत. पंढरीत जाऊन चंद्रभागा नदीत स्नान करून विठोबाचे दर्शन ही एकच इच्छा वारकर्‍यांच्या मनात असते. सध्या पावसाळा लांबल्यामुळे शेतकरी, वारकरी वर्ग चिंतेत आहे. पण असे असले तरी शेतीची कामे घरातील दुसऱ्या मंडळीवर सोपवून ते आषाढीच्या वारीला येतातच. विठूरायाप्रति असणारी ही भक्तीची प्रेरणाच त्यांना सर्व अडचणीतून बाहेर पडण्याची शक्ती देते.
- भावार्थ देखणे, मुख्य विश्वस्त, श्रीक्षेत्र आळंदी संस्थान.
आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग! जे नियमित वारी करतात, ते कोणत्याही अडचणींची पर्वा करत नाहीत. यंदा अधिक महिना आल्यामुळे आषाढीचा सोहळा पुढे आला. त्यात पाऊसही म्हणावा तेवढा झाला नाही, येत्या काही दिवसात पाऊस पडल्यास वारी नेहमीसारखी भरेल. आपली काळजी वाहायला विठूमाऊली आहे की. आपण फक्त त्याला विसरायचे नाही.
- ह.भ.प. जालिंदर महाराज मोरे, मुख्य विश्वस्त, श्री संत तुकाराम महाराज संस्थान. देहू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT