Asalpha Hill Ghatkopar Pudhari
मुंबई

Asalpha Hill: मुंबईतल्या या टेकडीवर राहतात 20 ते 25 हजार नागरिक, पावसाळा सुरू झाला की भरते धडकी

Mumbai Landslide Prone Area: पाच ते सहा हजार झोपड्या असलेली मोठी डोंगराळ वस्ती

पुढारी वृत्तसेवा

Ghatkopar Asalpha LandSlide Prone Area

मुंबई : प्रशांत बढे

मुंबईत विविध भागात डोंगर उतारावर व उंच टेकड्यांवर झोपड्या वसल्या आहेत. मुंबई उपनगरात तर मोठ्या प्रमाणत डोंगर रांगा असून यावर हजारो कुटुंब वसलेली आहेत. यातीलच एक म्हणजे सुमारे 20 ते 25 हजार नागरिक राहत असलेली असल्फा टेकडी. शहरातील धोक्याचे मोठे ठिकाण. जुलै 2000 साली या टेकडीचा मोठा भाग आझाद नगरवर कोसळला आणि त्यात 78 नागरिकांचा मृत्यू तर शेकडो नागरिक जखमी झाले. अनेक कुटुंब उध्वस्त झाली. अनेकांचे छत्र हरपले. पावसाळा सुरू झाला की येथील रहिवाशांच्या डोळ्यसमोर ती दुर्घटना आपसूकच येते आणि धडकी भरते. इतक्या वर्षानंतरही येथील परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही.

असल्फा टेकडी म्हणजे सुमारे पाच ते सहा हजार झोपड्या असलेली मोठी डोंगराळ वस्ती. या टेकडी वर मुकुंदराव आंबेडकर नगर, भीम नगर, अजिंक्य तारा परिसर, हनुमान टेकडी, क्रांती नगर, शांती नगर, सुभाष नगर, गणेश कमिटी परिसर, लालबत्ती परिसर असे वेगवेगळे विभाग आहेत. 1970 साली असल्फा टेकडीवर झोपड्या बांधण्यास सुरूवात झाली. त्यानंतर दुष्काळ पडला आणि या टेकडीवर झोपड्या वाढू लागल्या, असे येथील रहिवाशी सांगतात.

झोपड्या वाढत गेल्या, लोकवस्ती वाढली. तशा या डोंगराळ भागात सोयीसुविधा पोहचविणे कठीण होऊन गेले. सुविधांबरोबरच या भागात सुरक्षितता हा नेहमीच मोठा मुद्दा राहिला आहे. या टेकडीवर आजही पिण्याच्या पाण्याची समस्या, स्वच्छता, शौचालय आणि अनेक मुलभूत समस्या भेडसावत आहेत. तरीही अतिक्रमण सुरूच आहे. अगदी डोंगराच्या कपारीपर्यंत आता घरे बांधून झाली आहेत. ही घरे इतकी धडकी भरवणारी आहेत की कधी काही होईल याचा नेम नाही. त्यामुळे जास्तीत जास्त संरक्षक भिंती उभारणे आणि सुरक्षेच्या उपाययोजना करणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना एक वर्षांपूर्वी या टेकडीवर जाऊन त्यांनी या विभागाची पाहणी केली होती. त्यांच्या आदेशाने स्थानिक नगरसेवक किरण लांडगे यांच्या प्रयत्नाने या टेकडीवरील हनुमान टेकडी परिसराला सुरक्षित करण्यासाठी भली मोठी संरक्षण जाळी लावण्यात आली. यामुळे इथून दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता कमी झाली आहे. मात्र अजूनही असल्फा टेकडीचा आझाद नगर बाजूचा भाग धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे प्रशासनाने या टेकडीला सुरक्षेचे कडे बनविणे, सुरक्षा जाळ्या लावणे आणि आवश्यक आहे तिथे संरक्षक भिंती उभारणे गरजेचे आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही हनुमान टेकडी परिसरात संरक्षण जाळ्या लावून हा विभाग सुरक्षित केला आहे. तर शांती नगर, क्रांती नगर आणि आझाद नगरच्या वरील परिसरच्या जाळीकरणाचे काम लवकरच करून घेणार आहोत. या टेकडीवरील तीनशे पेक्षा जास्त धोकादायक घरांना सुरक्षित स्थळी घरे मिळवून देऊन इथली धोकादायक स्थिती कमी करणार आहोत.
किरण लांडगे, माजी नगरसेवक
या भागात दरड कोसळण्याची घटना घडली होती, तेव्हापासून लोक प्रचंड भीतीच्या छायेत दिवस काढत आहेत. पालिका दरवर्षी पावसाळ्यात या भागाला नोटीस देते. या भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठी संरक्षक भिंत उभारणे गरजेचे आहे. इथल्या धोकादायक ठिकाणी राहणार्या कुटुंबाना हक्काचे सुरक्षित घर देऊन हा भाग सुरक्षित करणे गरजेचे आहे.
शहाजी आल्हाट, स्थानिक नागरिक
ही टेकडी धोकादायक असल्याने आम्ही सहकुटुंब इथून इतर सुरक्षित विभागात स्थलांतरित झालो आहोत. या टेकडीच्या वरूनच विमाने जातात. त्यामुळे इथे इमारती उभारणे शक्य नाही. सरकारने या असल्फा टेकडीचा पुनर्विकास धारावी, रमाबाई आंबेडकरनगर सारखा केल्यास इथल्या सगळ्याच समस्या सुटतील.
सुशील वाघ, स्थानिक नागरिक
ही सगळी टेकडीच धोकादायक झाली आहे. घरोघरी शौचालय झाल्यामुळे तर डोंगर आणखीणच ठिसूळ झाला आहे. पालिका प्रशासनाचे आणि सरकारचे या टेकडीकडे लक्ष नाही. इथे सुरक्षेच्या तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर पुन्हा मोठी दुर्घटना होईल. अनेकांचे प्राण जाऊ शकतात.
गौतम हराळ, स्थानिक नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT