

मुंबई : विरार येथे राहणार्या संध्या सुभाष फाटक (वय 21) या विद्यार्थिनीने विलेपार्ले येथील साठे कॉलेजच्या तिसर्या मजल्यावरुन उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली. तिच्याकडे सुसाईड नोट न सापडल्याने जीवन संपवण्याचे कारण समजू शकले नाही.
याप्रकरणी तिच्या पालकांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून मित्र-मैत्रिणीचीही लवकरच चौकशी होणार आहे. तिचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून तपासणीचे काम सुरू आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करुन तपास सुरू केला आहे.
संध्या ही आई-वडिलांसोबत विरार येथे राहत होती. सायन्स सॅटिटीकच्या तिसर्या वर्षात शिकत होती. सकाळी सात वाजता ती नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये आली. वर्गात न जाता तिसर्या मजल्यावर गेली आणि तेथून उडी घेतली. हा प्रकार काही प्राध्यपकांच्या निदर्शनास येताच त्यांनी विलेपार्ले पोलिसांना ही माहिती दिली.
या माहितीनंतर घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी संध्याला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी तिच्या पालकांची जबानी नोंदवून घेतली आहे. सुरुवातीला संध्याला कोणीतरी धक्का दिला असावा असा तिच्या पालकांनी आरोप केला होता, मात्र सीसीटिव्ही फुटेजमध्ये तसा प्रकार उघडकीस आला नाही.