मुंबई : डोंबिवलीचा तरुण अर्णव खैरे या तरुणाने लोकलमध्ये झालेल्या मारहाणीचा धसका घेत केलेल्या आत्महत्येवरून मुंबईत मराठी-अमराठी वाद पेटला आहे. केवळ हिंदी बोलला म्हणून अर्णवला मारहाण झाली. त्यावरून भाजपने मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला जबाबदार धरत शनिवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर आंदोलन केले.
भाषा, प्रांत यांच्या आधारे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे राजकारण काही राजकीय पक्ष आणि राजकीय व्यक्ती करत आहेत. अशा लोकांना आणि पक्षांना ‘सद्बुद्धी द्या’ अशी प्रार्थना भाजपनेत्यांनी स्मृतिस्थळी केली. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वात झालेल्या या अनोख्या आंदोलनात तोंडाला काळी पट्टी बांधून, हातामध्ये फलक घेऊन भाजप नेते-कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात आमदार प्रसाद लाड, अतुल भातखळकर आदींचा समावेश होता. भाजपच्या या आंदोलनामुळे वादविवाद होऊन परिस्थिती हाताबाहेर जाईल म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
भाजपने एका तरुणाच्या मृत्यूवरून खालच्या स्तरावरचे घाणेरडे राजकारण करू नये. ज्यावेळेस ट्रेनमधून पाच माणसे पडली तेव्हा भाजपला येथे येऊन कोणाच्या पाया पडावे आणि बुद्धी द्यावी, असे वाटले नाही का?, तेव्हा अश्विनी वैष्णव यांच्याकडे जाऊन लोकल व्यवस्थित चालावी म्हणून सुबुद्धी द्यावी असे वाटले नाही काय?, अशा शब्दांत ठाकरे गट आणि मनसेने भाजपाला प्रत्युत्तर दिले. या प्रकरणातील तथ्य उघडकीला आणून दोषींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन मनसेसह शिंदे गटाच्या शिवसेनेने पोलिसांना दिले आहे.
भाषा, प्रांत यांच्या आधारे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे राजकारण काही राजकीय पक्ष आणि राजकीय व्यक्ती करत आहेत. स्वत:चे संपलेले राजकारण पुन्हा जिवंत करण्यासाठी प्रक्षोभक अशा प्रकारची विधाने करीत आहेत, लोकांची माथी भडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. ‘भाषा, प्रांत याचा भेद विसरून माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हेच आमचे मागणे’ या गीताचा अर्थ मराठीचा कैवार घेणाऱ्यांनी समजून घ्यावे आणि या गीतापासून काहीतरी शिकावे, अशी आमची इच्छा आहे.अमित साटम, मुंबई भाजपचे अध्यक्ष
अर्णव यांच्या मृत्यूमुळे खैरे कुटुंब शोकाकुल असताना त्यांच्या पुत्राच्या मरणाचे भाजपकडून घाणेरडे राजकारण केले जात आहे. आज भाजप नेते बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर आले, म्हणजेच महाराष्ट्रात बाळासाहेबांशिवाय यांचे पान हलू शकत नाही, हे सिद्ध झाले. सत्ता आणि पैसा तुमच्याकडे असताना अर्णवच्या मारेकऱ्यांना शोधून काढा, असे आव्हान देत ते भाजपाचे कार्यकर्ते आहेत आणि हे प्रकरण आपल्यावर शेकेल याची भाजपाला कुणकुण लागली आहे काय?किशोरी पेडणेकर, ठाकरे गट
अर्णवला झालेल्या मारहाणीचे सत्य अजूनही बाहेर आलेले नाही, पण ज्यांच्याबरोबर वाद झाला, ते कोण आहेत ते पकडले गेलेले नाहीत. मग त्याच्या आधीच अमित साटम यांना आंदोलनाची एवढी घाई आणि खाज कशासाठी? आम्ही अटल बिहारी वाजपेयी यांना स्मरून त्यांना प्रार्थना करतो की, भारतीय पक्षात जन्माला आलेल्या नीच प्रवृत्तीच्या लोकांना त्यांनी सुबुद्धी द्यावी. मुंब्य्रात लोकलमधून पाच माणसे पडली, तेव्हा अमित साटम यांना येथे येऊन पाया पडावे आणि बुद्धी द्यावी, असे वाटले नाही का?संदीप देशपांडे, मनसेचे मुंबई अध्यक्ष