छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालसुधारगृहाची मान्यता रद्दबातल File Photo
मुंबई

छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालसुधारगृहाची मान्यता रद्दबातल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत घोषणा

पुढारी वृत्तसेवा

Approval of Vidyadeep Child Reformatory in Chhatrapati Sambhajinagar cancelled

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप बालसुधारगृहातील मुलींवर घडलेल्या अमानवी व अघोरी प्रकाराचे पडसाद बुधवारीही विधान परिषदेत उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या सुधारगृहाची मान्यता रद्द करण्याची, तसेच संबंधित जिल्हा बालविकास अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याची घोषणा केली.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अंतिम अहवालानंतर दोषी ठरणाऱ्यांना निलंबित करून सर्वांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. या सुधारगृहात आजारी पडणाऱ्या मुलींवर पाणी शिंपडणे आणि शरीरावर, कपाळावर व अन्य ठिकाणी 'क्रॉस'सारखे चिन्ह काढण्याचे अघोरी प्रकार होतात, हा मुद्दा भाजप आमदार चित्रा वाघ आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडला.

त्यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यादीप वालसुधारगृहाची मान्यता रद्द करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री म्हणाले, तेथे घडलेल्या घटना आणि अनियमितता भयानक आहे. याप्रकरणी चौकशीसाठी तीन वरिष्ठ महिला पोलिस निरीक्षकांची समिती स्थापन करण्यात आली असून, त्यांनी ८० मुलींशी चर्चा केली. सुरुवातीला त्या बोलायला तयार नव्हत्या; मात्र हळूहळू त्यांनी काही गंभीर माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणी अधीक्षक आणि इतरांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, इतर संबंधितांवरही कारवाई सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

संस्थेला पुन्हा मान्यता देणार नाही :

संबंधित संस्थेची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. संस्थेचा कार्यकाळ संपला असल्यास पुन्हा मान्यता दिली जाणार नाही आणि मान्यता दिली असल्यास ती त्वरित रद्द करण्यात येईल, असे सांगतानाच समितीचा अंतिम अहवाल लवकरच प्राप्त होणार असून, त्यामध्ये दोषी ठरलेल्यांना निलंबित करून सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

उच्च न्यायालयाकडूनही गंभीर दखल

उच्च न्यायालयानेही या प्रकरणाची दखल घेतली असून, विशेष निरीक्षकाची नियुक्ती केली असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या कार्यवाहीसोबतच सरकार स्वतंत्रपणे चौकशी करत आहे. सरकारमधील कोणतीही व्यक्ती, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या मदत केली असेल किंवा आपले कर्तव्य निभावण्यास कुचराई केली असेल, तर अशा प्रत्येकाला निलंबित करण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT