नेरुळ : नेरुळ येथील शिवाजी चौकातील पुतळा अनावरणाचा विषय दिवसेंदिवस चिघळत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवभक्तांसह अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्ते पुतळ्याच्या अनावरणाची मागणी करत आहेत. मात्र प्रशासन याबाबत कोणताच विचार करताना दिसत नाही. त्यामुळे शिवभक्तांसह माजी महापौर जयवंत सुतार यांनीही अनावरणासाठी आक्रमक पवित्रा घेत याबाबत थेट मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला आहे.
नवी मुंबई महापालिका अस्तित्वात नसताना नेरुळ से.1 येथील चौक तयार करण्यात आला होता. महापालिका अस्तित्वात आल्यावर रितसर महासभेत ठराव मांडून छ.शिवाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले. 1995 ते 1996 या कालखंडात जयवंत सुतार नगरसेवक असताना त्यांनी चौकात छ. शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा ठराव मांडून प्रस्ताव मंजूर करून घेतला. त्यानंतर महापालिका प्रशासनाने विविध खात्यांच्या परवानग्या घेऊन सुतार महापौर असताना छ. शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा प्रस्ताव मंजूर केला.
महापौर स्वेच्छा निधी अंतर्गत 50 लक्ष रुपये खर्च करून शिवाजी चौकाचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेतले व महापालिका फंडामधून सिंहासनारूढ छ. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आता महाराजांचा पुतळा तयार असूनही गेल्या अनेक महिन्यांपासून हिरव्या जाळीत पुतळा झाकून ठेवला आहे.महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होत नाही ही शोकांतिका असल्याचे बोलले जात आहे.
नुकत्याच पार पडलेल्या शिवजयंती व महाराष्ट्र दिन या दिवशी तरी छ.शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे अनावरण होईल, अशी अपेक्षा होती. परंतु पुतळ्याचे अद्यापही अनावरण करण्यात आले नाही. त्यामुळे शिवप्रेमी नागरिकांच्या मनात असंतोष खदखदत आहे. काही दिवसांनी महापालिका निवडणूक होणार असून आचारसंहिता लागणार आहे. त्यापूर्वी पुतळ्याचे अनावरण करण्याची मागणी माजी महापौर जयवंत सुतार यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री, आयुक्त व पोलीस आयुक्त यांना पत्राद्वारे केली आहे.
प्रशासनाने येत्या 15 दिवसांत महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण न केल्यास मी व शिवप्रेमी नागरिक शिवाजी चौकात उपोषण करणार आहोत. पत्राची दखल तातडीने घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांसह प्रशासनाला केली आहे, अशी माहिती सुतार यांनी दिली.