Onion potato shortage pudhari photo
मुंबई

Onion potato shortage : आवक निम्म्यावर; कांदा-बटाट्याचा तुटवडा भासणार

50 किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्या तीन दिवसांपासून ट्रकमध्येच पडून

पुढारी वृत्तसेवा

वाशी : ओझ्याखाली पिचलेले एपीएमसीतील कांदा-बटाटा मार्केटमधील माथाडी कामागार 50 किलोपेक्षा अधिकचे वजन उचलत नसल्याने कांदा-बटाट्याची आवक निम्म्यावर आली आहे. गुरुवारीही अनेक व्यापाऱ्यांकडील कांदा-बटाटा माथाडींनी उतरवला नाही. नियमित आवक 200 ते 225 गाडी असते; मात्र मागील दोन दिवसांत 85 ते 90 गाड्या आवक बाजारात झाली आहे. त्यामुळे मालाचा तुटवडा भासून भाव वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्टआणि जनरल कामगार युनियनने नियमाप्रमाणे कृषिमालाच्या गोणीचे वजन 50 किलो असावे, अशी मागणी लावून धरली आहे. 2 मार्चपासून 50 किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांची चढ-उतार करणे बंद केले आहे.

गुरुवारीदेखील जादा वजनाच्या गोण्यांची आवक झाल्याने व्यापारावर परिणाम झाला. मागील दोन दिवसांपासून येथील उलाढाल निम्म्यावर आली आहे. कांदा-बटाटा आडत व्यापारी संघाचे अध्यक्ष संजय पिंगळे यांनी सांगितले की, माथाडी कामगारांच्या मागणीशी आम्ही सहमत आहोत. असे असले तरी राज्यातील 350 बाजार समितीमध्ये आधी हा नियम लागू करावा. मग मुंबई बाजार समितीमध्ये लागू करावा.

तसेच शासनाने गोणी उत्पादन करणाऱ्या उद्योजकांना 50 किलोच्या गोणीऐवजी 48 किलोची गोणी करण्याचे आदेश द्यावेत. पणन मंत्री यांनी या प्रकरणात मध्यस्थी करून अंमलबजावणीसाठी दोन महिने अवधी द्यावा, जेणेकरून मुंबईचा पुरवठा थांबणार नाही.

येथेच नियम का?

पनवेल, कल्याण, ठाण्यात 55 ते 60 किलो गोणी भराई चालते, मग आमच्याच मार्केटला हा नियम का लावला जात आहे, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

भाव वाढणार

तीन दिवसांपासून आवक अर्ध्यावर आल्याने कांदा आणि बटाटा यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. लवकरच यावर तोडगा निघाला नाही, तर भाव वाढण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT