कांदिवली : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांसह बच्चे कंपनी मनसोक्त वनराणी म्हणजेच मिनी टॉय ट्रेनचा आनंद लुटत आहेत.नव्या लूकच्या वनराणीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 6 जानेवारीला सुरू झालेल्या वनराणीचा 10 हजाराहून अधिक पर्यटकांनी मनसोक्त आनंद लुटला असून जवळपास 8 लाखांचे उत्पन्न संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला मिळाले आहे.
बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन कधी धावणार? असा प्रश्न बच्चे कंपनी आणि पर्यटकांमध्ये चर्चिला जात होता. 1974 मध्ये सुरू करण्यात आलेली, दरवर्षी जवळपास 50 लाखांचा महसूल देणारी पर्यटकांची लाडकी, लहानांपासून मोठ्यांना भुरळ पाडणारी, आकर्षित करणारी वनराणी, म्हणजेच मिनी टॉय ट्रेन 2021 च्या तौक्ते वादळात बंद पडली होती. यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणाऱ्या हजारो पर्यटकांचा हिरमोड झाला होता. अखेर 6 जानेवारी 2026 रोजी पर्यटकांच्या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला.
नव्याने सुरू करण्यात आलेल्या दोन मिनी टॉय ट्रेनचे आकुर्ती इंटरप्राइजेस, एन्सी रेल आणि खोडल कॉर्पोरेशन या कंत्राटदार कंपन्यांनी काम केले आहे. कृष्णगिरी येथून सुटणाऱ्या वनराणीच्या मार्गाचे, रुळाचे तसेच मार्गातील कृत्रिम बोगद्याचे एवढेच नव्हे तर कृष्णगिरी स्थानकाला फुलपाखराचे स्वरूप देऊन आकर्षक नूतनीकरण करण्यात आले आहे.
शनिवार आणि रविवारी दोन्हीही ट्रेनचे 8 ते 10 राउंड होतात. दोन्हीही चार्जिंग बॅटरीवर धावणाऱ्या ट्रेन असून एका ट्रेनमध्ये लांब लाकडी बाकडे असलेली संपूर्ण ओपन तर दुसरी नव्या रूपात, नवीन पारदर्शक मेट्रो ट्रेनसारखे डबे, प्रशस्त आसन व्यवस्था, मोठ्या काचेच्या खिडक्या, प्रत्येक डब्यावर उद्यानातील पक्षी,प्राण्यांचे फोटो पर्यटक तसेच बच्चे कंपनीला भुरळ पाडत आहे.
वनराणीचे पुनरुज्जीवन पर्यावरणपूरक पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना मिळाली आहे. प्रशस्त आसन व्यवस्था, चार पारदर्शक डबे व नावीन्यपूर्ण आकर्षक वनराणी पर्यटकांना भुरळ पाडत आहे.किरण पाटील,उपसंचालक