APAR ID File Photo
मुंबई

APAR ID HSC Students: बारावीचे 1 लाख 72 हजार विद्यार्थी अद्याप ‘अपार’बाहेर

पुणे व मुंबईत अपार आयडी नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक; सीईटी प्रवेश प्रक्रियेवर संकट

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पवन होन्याळकर

राज्यात सीईटी परीक्षेसाठी आधार प्रमाणीकरणासह ‌‘अपार आयडी‌’ सक्तीचा निर्णय जाहीर करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात बारावीच्या 1 लाख 72 हजार 369 विद्यार्थ्यांचे अपार आयडी अद्याप तयार झालेले नाहीत. राज्यात सर्वाधिक अपार नसलेले विद्यार्थी पुणे जिल्ह्यात असून तब्बल 18 हजारांहून अधिक विद्यार्थी अजूनही अपार प्रणालीबाहेर आहेत. मुंबईतही 14 हजार 285 विद्यार्थी अपार नोंदणीपासून दूर आहेत.

राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी उमेदवारांना अपार आयडी सक्तीचा करण्यात आल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून देण्यात आली आहे. असे असले तरी मोठ्या संख्येने बारावीच्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार नसल्याने प्रवेश प्रक्रियेपुढे गंभीर अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

राज्यातील इयत्ता बारावीच्या यूडायसकडे नोंदणी असलेल्या एकूण 14 लाख 41 हजार 964 विद्यार्थ्यांपैकी 12 लाख 69 हजार 595 विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झाले आहेत. म्हणजेच 1 लाख 72 हजार 369 विद्यार्थी अजूनही अपार प्रणालीबाहेर आहेत. धाराशिव जिल्ह्यात केवळ 81.4 टक्के अपार नोंदणी झाली असून 3 हजार 29 विद्यार्थी अजूनही अपारविना आहेत. सोलापूरमध्ये 51 हजार 489 पैकी तब्बल 9 हजार 623 विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झालेले नाहीत. नांदेडमध्ये 6 हजार 753, वाशीममध्ये 3 हजार 572, जालना जिल्ह्यात 5 हजार 118 तर परभणीमध्ये 3 हजार 29 विद्यार्थी अद्याप अपार प्रक्रियेपासून दूर आहेत. गोंदिया जिल्ह्यात 2 हजार 892, अमरावतीमध्ये 4 हजार 724, अकोल्यात 3 हजार 364, वर्ध्यात 1 हजार 959 तर चंद्रपूरमध्ये 3 हजार 90 विद्यार्थी अपार आयडीविना आहेत. गडचिरोलीत प्रमाण तुलनेने चांगले असले, तरी तेथेही 1 हजार 131 विद्यार्थी अद्याप नोंदणीत आलेले नाहीत. नाशिकमध्ये 8 हजार 993 विद्यार्थी, जळगावमध्ये 6 हजार 151, धुळे जिल्ह्यात 3 हजार 189 तर नंदुरबारमध्येही 1 हजार 494 विद्यार्थी अपार नोंदणीपासून वंचित आहेत.

कोकणातील पालघरमध्ये 5 हजार 440, रायगडमध्ये 3 हजार 654 तर ठाणे जिल्ह्यात 9 हजार 676 विद्यार्थी अपारविना आहेत. सिंधुदुर्ग (98.3 टक्के), रत्नागिरी (95.6 टक्के), अहिल्यानगर (93.2 टक्के), बीड (92.5 टक्के), भंडारा (92.3 टक्के) आणि सातारा (91.9 टक्के) या जिल्ह्यांमध्ये अपार नोंदणी तुलनेने समाधानकारक आहे.

आधार प्रमाणीकरणातील अडथळे

पालकांची अपुरी माहिती, तांत्रिक अडचणी, सर्व्हर समस्या आणि वेळेवर मार्गदर्शनाचा अभाव ही अपार नोंदणी अपूर्ण राहण्यामागील प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे. सीईटीसाठी अपार सक्ती करताना आधी सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण होईल यासाठी शिक्षण विभागाने स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी शिक्षक आणि पालक संघटनांकडून केली आहे.

सीईटी बरोबरच जेईई मेन 2026 परीक्षेसाठी नोंदणीसाठी आधार सक्ती आहे. आता नोंदणी केलेल्या उमेदवारांना अपलोड केलेली ओळख कागदपत्रे पुन्हा तपासण्याचे निर्देश राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) दिले आहेत. आधारव्यतिरिक्त इतर ओळखपत्रांवर नोंदणी केलेल्या काही उमेदवारांचे थेट छायाचित्र आणि यूआयडीएआयचा नोंदीतील छायाचित्र जुळत नसल्याचे आढळून आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT