mangalprabhat lodha Pudhari
मुंबई

Drug Free Mumbai‌: ‘ड्रग्ज फ्री मुंबई‌’साठी उच्चस्तरीय समिती; मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे जबाबदारी

मुंबईसाठी 12 कलमी कार्यक्रम राबविणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: गोरेगाव येथील नेस्को संकुलातील एका संगीत कार्यक्रमातील ड्रग्जबळीनंतर राज्य सरकारने ‌‘ड्रग्ज फ्री मुंबई‌’साठी विशेष उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय केला आहे. मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा या समितीचे अध्यक्ष आहेत.

या समितीच्या माध्यमातून मुंबईत 12 कलमी विशेष कार्यक्रम राबविला जाणार आहे. येत्या 21 जूनपासून या कार्यक्रमाची सुरुवात होणार असून त्यासाठी मुंबईतील प्रत्येक पोलिस परिमंडळात स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गोरेगाव येथील ड्रग्ज प्रकरणानंतर मंत्री लोढा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले होते. या समितीच्या बैठकीत मुंबईत जून 2026 ते जून 2027 या कालावधीत 12 विशेष उपक्रम राबविले जाणार आहेत. याची सुरुवात 21 जूनपासून घोषवाक्य आणि पोस्टर स्पर्धेने होईल.

त्यानंतर जुलैमध्ये सोशल मीडियावर रील स्पर्धा, ऑगस्टमध्ये शाळा-महाविद्यालयांत नशामुक्ती शपथ, सप्टेंबरमध्ये स्ट्रीट प्ले, ऑक्टोबरमध्ये गांधी जयंतीनिमित्त शहरव्यापी रॅली, नोव्हेंबरमध्ये ‌‘ड्रग्ज फ्री मुंबई फेस्ट‌’, डिसेंबरमध्ये युवा संवाद, जानेवारीत ‌‘नो ड्रग्ज झोन‌’ मोहीम, फेब्रुवारीत निबंध स्पर्धा, मार्चमध्ये फिटनेस मॅरेथॉन, एप्रिलमध्ये यशोगाथा मांडणी आणि मेमध्ये उत्कृष्ट वॉर्ड व कॅम्पस पुरस्कार असे कार्यक्रम होणार आहेत.

या मोहिमेचे घोषवाक्य ‌‘नशामुक्त मुंबई, सुरक्षित भविष्य‌’, ‌‘आपली मुंबई, नशामुक्त मुंबई‌’ आणि ‌‘मुंबई अंगेन्स्ट ड्रग्ज (मॅड) असे ठेवण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, कॉर्पोरेट क्षेत्र, धार्मिक संस्था, सेलिब्रिटी आणि रहिवासी संघटनांना यात सहभागी करून घेण्यात येणार आहे.

स्वतंत्र समन्वय समिती

या मोहिमेसाठी मुंबईतील प्रत्येक पोलिस परिक्षेत्रात स्वतंत्र समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. या समित्यांमध्ये वॉर्ड अधिकारी, शिक्षण अधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे प्रतिनिधी, महिला व बालकल्याण अधिकारी, समुपदेशक, पत्रकार प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था तसेच स्थानिक पोलिस निरीक्षकांचा समावेश असेल. विविध घटकांना एकत्र आणून समाजपातळीवर ड्रग्जविरोधी जनचळवळ उभारण्याचा उद्देश असल्याचे लोढा यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT