मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साडेतीन किलोमीटर लांबीच्या टप्प्याची आज प्रत्यक्ष पाहणी केली. File Photo
मुंबई

किनारी रस्ता प्रकल्पातील उत्तर मार्गिकेचा आणखी एक टप्पा होणार खुला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत प्रवासाची सुविधा देणारा टप्पा आणि हाजी अली आंतरबदलातील आर्म ८ (लोटस जेट्टी जंक्शनपासून ते उत्तर वाहिनी मार्गिकेवरील हाजी अली येथील मुख्य पूल) गुरुवार ११ जुलै २०२४ रोजी सकाळी ७ वाजेपासून तात्पुरत्या स्वरुपात खुला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साडेतीन किलोमीटर लांबीच्या टप्प्याची आज प्रत्यक्ष पाहणी केली.

किनारी रस्ता प्रकल्पातील हाजी अली (लोटस जंक्शन) ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतचा तिसरा टप्पा ११ जुलै २०२४ रोजी सकाळी ७ वाजता खुला करण्यात येईल. हा टप्पा आठवड्यात सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत वाहतुकीसाठी सुरू राहील. प्रकल्पातील उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हा टप्पा बंद राहील. सागरी सेतूपर्यंत जाण्यासाठी हा तात्पुरत्या स्वरुपाचा मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) यतीन दळवी, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) गिरीश निकम, उपप्रमुख अभियंता मांतय्या स्वामी आदींसह अभियंते, अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

दौऱ्याच्या प्रारंभी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. गगराणी यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना प्रकल्पाविषयी तसेच टप्प्या-टप्प्याने सुरू झालेल्या मार्गिकांची माहिती दिली. हाजी अली ते खान अब्दुल गफार खान पर्यंतचा उत्तर दिशेने जाणाऱ्या ३.५ किलोमीटर मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून, नागरिकांच्या सोयीकरिता तात्पुरत्या स्वरुपात ही मार्गिका खुली करण्यात येत आहे. या मार्गिकेवरुन पुढे जावून फक्त सागरी सेतूकडे जाता येईल. (वरळी व प्रभादेवी परिसरात जाण्यासाठी डॉ. अॅनी बेझंट मार्ग व खान अब्दुल गफार खान मार्ग या नेहमीच्या रस्त्यांचा वापर करावा लागेल.)

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मुंबईतील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प मोलाची भूमिका बजावत आहे. प्रकल्पातील विविध टप्पे जसजसे पूर्ण होत आहेत तसतसे ते वाहतुकीसाठी खुले करून दिले जात आहेत. त्यामुळे एकाच वेळी प्रकल्पाचे काम होत असताना वाहतुकीला देखील वेग मिळतो आहे. संपूर्ण किनारी रस्ता प्रकल्पापैकी ९१ टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे वरळी सी लिंक) टोकापर्यंत बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाचे आतापर्यंत ९१ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील आंतरमार्गिका, रस्ते, सागरी पदपथ आदी कामे अंतिम टप्प्यात आहेत.

उत्तर दिशेने प्रवासाची सुविधा देण्यासाठी १० जून २०२४ रोजी मरीन ड्राईव्ह ते हाजी अली मार्गे लोट्स जंक्शनपर्यंत सुमारे ६.२५ किलोमीटरचा दुसरा टप्पा खुला करण्यात आला होता. आता हा टप्पा तात्पुरता खुला करण्यात येत आहे. त्यामुळे उत्तरेकडे प्रवासासाठी मरीन ड्राईव्ह ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतचा एकूण ९.७५ किलोमीटरचा टप्पा उपलब्ध होणार आहे. खान अब्दुल गफार खान मार्गावर प्रवेश केल्यानंतर तेथून पुढे राजीव गांधी सागरी सेतू (वरळी वांद्रे सागरी सेतू) वर प्रवेश करणे शक्य होणार आहे. त्यामुळे मरीन ड्राईव्हवरून थेट सागरी सेतूपर्यंत जलद प्रवास करता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT