मुंबई: झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) मुंबईतर्फे घाटकोपरमध्ये उभारण्यात येणाऱ्या 'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था' या प्रकल्पाचे काम वेळेपूर्वी पूर्ण करू आणि जुलै २०२९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे लोकार्पण करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी घाटकोपरच्या ज्या चिराग नगर भागात आपले जीवन व्यतीत केले तिथेच 'एसआरए'च्या माध्यमातून स्मारकाची उभारणी केली जात आहे. अण्णा भाऊंच्या उत्तुंग पुतळ्यासोबतच 'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था' उभारली जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारी या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. स्मारकाच्या कोनशिलेचेही अनावरण यावेळी झाले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, मंत्री संजय शिरसाट, खा.संजय दिना पाटील, आ. राम कदम, आ. अमीत साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह अण्णा भाऊ साठे यांचे नातेवाईक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी 'पारदर्शकतेकडून परिवर्तनांकडे' या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन केले. हे पुस्तक झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने तयार करण्यात आले असून यामध्ये संस्थेच्या विविध प्रकल्पांची व कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली आहे.
सर्वांचे पुनर्वसन करूनच भूमिपूजन
याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अण्णा भाऊ साठे जिथे राहिले तिथे त्यांचे भव्य स्मारक व्हावे, अशी मागणी २०-२५ वर्षांपासून सातत्याने होत होती. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर २०१६ मध्ये त्याबाबत प्रथम निर्णय घेतला. स्मारकासाठी जागा अधिग्रहित करून तिथे प्रकल्प सुरू करण्यासाठी समिती स्थापन केली.
मात्र, स्मारकापेक्षा इथल्या एसआरए पुनर्विकास प्रकल्पातच अनेकांचा रस असल्याचे आढळले. त्यामुळे खासगी विकासकाच्या हातात हा प्रकल्प न देता 'एसआरए'च्या माध्यमातूनच स्मारकाचे काम करण्याचा निर्णय घेतला. मात्र, २०१९ मध्ये आमचे सरकार गेले आणि पुढची दोन अडीच वर्षे या प्रकल्पाबाबत फारसे काही झाले नाही.
नंतर २०२४ मध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद व माझ्याकडे गृहनिर्माण विभाग आल्यानंतर आम्ही या प्रकल्पाला पुन्हा वेग दिला. पुनर्वसनाचाही प्रश्न होता. त्यात पात्र-अपात्र रहिवासी असेही होते. मात्र, अण्णाभाऊंचे स्मारक वंचितांना उद्धवस्त करून उभारता येणार नाही, या भावनेने आम्ही पात्र-अपात्र असे निकष न ठेवता सगळ्यांचे पुनर्वसन केले. आज आम्ही प्रकल्पाचे भूमिपूजनही करत आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
वेळेआधी स्मारक पूर्ण करा
मुख्यमंत्री म्हणाले, आज आम्ही स्मारकारचे भूमीपुजन केले. नियोजित वेळापत्रकानुसार चार वर्षांनी हे काम पूर्ण होणार आहे. पण मी तुम्हाला शब्द देतो की या संस्थेचे उदघाटन जुलै २०२९ मध्येच करण्यात येईल व त्याच्या उदघाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी घेऊन येईन, क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यातील स्मारकाचे कामही ६५ टक्के पूर्ण झाले आहे. हे स्मारक देखील लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
विद्रोहाचा, वंचित आणि कष्टकऱ्यांचा आवाज
अण्णाभाऊ साठे हे भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात, गोवा मुक्ती संग्रामात तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात विद्रोहाचा आवाज बनले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तर अण्णाभाऊ आणि शाहिर अमर शेख यांनी तरूणांच्या रक्तात सळसळ निर्माण केली. तत्कालीन राज्य आणि केंद्र सरकारच्या रोजच्या लाठीमारात जखमी झालेले आंदोलक या दोघांच्या काव्यातू पुन्हा लढायला सिद्ध होत. त्यामुळे आचार्य अत्रे यांनी तर अण्णाभाऊंच्या शाहिरीचे कौतुक करायला साक्षात छत्रपती शिवाजी महाराजच हवे होते अशी भावना व्यक्त केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
अण्णाभाऊ दिग्विजयी झाले
अण्णाभाऊ सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या छोट्या गावातून मुंबईत आले. हलाखीचे आयुष्य जगले. पण त्यांच्या साहित्यात प्रचंड विविधता होती. गोरगरिब,वंचितांचे दु:ख त्यांच्या साहित्यातून प्रकट झाले असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, अण्णाभाऊंच्या साहित्याचा जगातील २७ भाषांत अनुवाद झाला आहे.
२०२२ मध्ये रशियातील मॉस्को विद्यापीठात त्यांचा पुतळा उभारण्यात आला. त्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. तेव्हा रशियन साहित्यिक रशियन भाषेत अण्णाभाऊंचे साहित्य वाचून दाखवित असल्याचे पाहून माझा ऊर भरून आले, आपले अण्णाभाऊ दिग्विजयी झाल्याचा आनंद मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
मातंग समाजातील तरूणांनी पुढे यावे
बार्टीच्या धर्तीवर आता आर्टीची स्थापना करण्यात आली आहे. मातंग समाज हा कलावंतांची खाण आहे. मातंग समाजातील तरूणांनी आता शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातही पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यूपीएससी परीक्षेत यश संपादन करणारी विद्यार्थिनी प्रेरणा खवले या समाजातील पहिल्या आयएएस तरूणीचा सत्कारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केला.
जागतिक 'ज्ञानपीठ' - उपमुख्यमंत्री शिंदे
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे केवळ दगड-मातीचे स्मारक नसून अण्णाभाऊंच्या विचारांची प्राणप्रतिष्ठा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समतेचा संदेश जगभर पोहोचवणारे हे जागतिक 'ज्ञानपीठ' ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुती सरकार दिलेला प्रत्येक शब्द पाळते आणि या प्रकल्पासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
या प्रकल्पासाठी राज्य सरकारने ३०० कोटींची तरतूद केली असून, आवश्यकतेनुसार आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्यासाठी कोणतीही कमतरता ठेवणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकल्पात २० मीटर उंचीचा अण्णाभाऊ साठे यांचा कांस्य पुतळा, त्यांच्या गाजलेल्या 'फकिरा' कादंबरीवर आधारित जगातील सर्वात मोठे पुस्तक शिल्प, आधुनिक ग्रंथालय, संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कौशल्य विकास केंद्र, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र, अत्याधुनिक डिजिटल ऑडिओ-व्हिज्युअल दालन, मुलांसाठी डिस्कव्हरी झोन यांसारख्या सुविधा उभारण्यात येणार आहेत. या केंद्रातून संशोधनालाही चालना मिळेल. अण्णाभाऊंचे विचार पुस्तकापुरते मर्यादित न राहता आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जगभर पोहोचतील. या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन नव्या पिढीतून नवे अण्णाभाऊ घडतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
राज्य सरकार कष्टकरी, शेतकरी, वारकरी, कामगार आणि वंचितांच्या सन्मानाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. अण्णाभाऊंनी गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला. त्याच विचारातून सरकारने गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय घेतला असून रमाबाई आंबेडकर नगर, कामगार नगरसह विविध भागांतील झोपडपट्टीधारकांसाठी सुसज्ज घरे उभारण्याचे काम सुरू आहे.
महायुती सरकार केवळ इमारती उभारत नाही, तर सर्वसामान्यांचे आयुष्य बदलत आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व कुटुंबांचे, डॉ. महेंद्र कल्याणकर आणि कर्मचाऱ्यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.
डॉ. कल्याणकर यांचे अभिनंदन
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक प्रकल्पाचे सुरूवातीचे टप्पे अतिशय वेगाने आणि सुरळितपणे पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदनही केले.
वारसदारांचा सत्कार
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे वारसदार ज्योती साठे (नात),आरती साठे (नात), सावित्रीबाई साठे (सून), सचिन साठे (नातू) यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यावेळी सत्कारही करण्यात आला. या पिढीच्या साक्षीनेच अण्णा भाऊंचे हे स्मारक उभे राहणार आहे.