Anjali Damania On sanjay Shirsat : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा देणाऱ्या संजय शिरसाट यांना आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट आव्हान दिले आहे. "शिरसाट केवळ माध्यमांपुढे बोलतील, ते संजय राऊतांवर कोणताही खटला दाखल करणार नाहीत, कारण चौकशीत ते स्वतःच अडचणीत येतील. आता त्यांनी माझ्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करून दाखवावा," अशा शब्दांत दमानिया यांनी शिरसाट यांना आव्हान दिले आहे.
अंजली दमानिया यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मला संजय शिरसाट यांची कमाल वाटते. बॅग मधे चक्क पैसे दिसत असतांना, ते पैसे नाही, कपडे असतील असे शिरसाट म्हणूच कसे शकतात ? मी त्या व्हिडिओला झूम करून फोटो काढला आहे. हा माझ्या घरच्या व्हिडिओ, असे ते म्हणत आहेत. त्यांच्यात हिम्मत असेल आणि ते खरं बोलत असतील तर आजच्या आज त्यांनी त्यांच्या घरी माध्यमांना नेऊन दाखवावे की जी रूम वीडियो मधे दिसत आहे ती खरच त्यांच्या घरची आहे.मला ह्यात फक्त एक गोष्ट चुकीची वाटते की कोणाच्याही बेडरूममध्ये सीसीटीव्ही लावणे अतिशय चुकीचे आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा पैशांनी भरलेल्या बॅग सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत संजय सिरसाट त्यांच्या बेडरुममध्ये सिगारेट ओढत बसले असून त्यांच्याजवळ एक पैशांनी भरलेली बॅग दिसते, असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. ''संबंधित मंत्र्याला आयकर विभागाची नोटीस आली आहे. त्यांचा एक व्हिडिओ मला कोणतीरी पाठवला. त्यामध्ये सिरसाट पैशांनी भरलेली बॅग घेऊन बसलेले दिसतात. हे पुरावे सर्वत्र जात असतात. सरकारमध्ये आहात म्हणून तुम्हाला कोणी हात लावत नाही, हा एक भ्रम असते. हा भ्रम काही काळ टिकते. पण त्याच्यावर कारवाई होत असते.'' असे राऊत यांनी म्हटले आहे.
मुळात मुर्खासारखे वक्तव्ये करणे संजय राऊत यांना जमते. सकाळ, संध्याकाळ, दुपार ते एकनाथ शिंदे हे त्यांचे टार्गेट असतात. त्यांची गेलेली सत्ता आजही त्यांना झोपू देत नाही. व्हिडिओ काय दाखवतो? ते माझे घर आहे. मी बेडरूममध्ये बेडवर बसलो आहे, असे सांगत शिरसाट यांनी हा आरोप फेटाळल होता. आमच्याकडे मातोश्री नाही. चिट्ठी देऊन आत बोलावले जात नाही. कोणीही माझ्याकडे कामासाठी येते. व्हिडिओ काढला असेल त्यात गैर काही नाही. महिलांचा छळ करणारे दुसऱ्यांच्या बॅग काय पाहता? ती प्रवासानंतर आणलेली बॅग आहे. पैशाच्या बॅग ह्या अशा पडतात का? पैसे असते तर मी कपाटात ठेवले असते. या व्हिडिओमध्ये काहीही तथ्य नाही. तोच व्हिडिओ दोन वेळा पाहा. मग तुम्हाला समजेल की तुम्हाला तो किती मूर्ख आहे, असे सवाल शिरसाट यांनी उपस्थित केले होते.