

नवी दिल्ली : कुणाल कामरा हा कॉमेडियन आहे. मात्र तो जे बोलला ते कॉमेडियनकडून अपेक्षित नाहीच, कुणाल कामराला असे बोलण्याची काहीच गरज नव्हती. मात्र त्यानंतर शिंदे गटाच्या लोकांनी केलेली तोडफोड योग्य नाही. त्यासाठी शिंदे गटाकडून तोडफोडीची वसुली केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया कुणाल कामरा प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली. तसेच स्वप्ना पाटकरबद्दल खासदार संजय राऊत यांच्यावर जे आरोप केले गेले तो विषय बाजूला करण्यासाठी तर कुणाल कामराकडून असे बोलून घेतल नसेल ना? अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.
अंजली दमानिया दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य केले. दोन्ही शिवसेनेतील विषयावर बोलताना त्या म्हणाल्या की, अलीकडेच शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी स्वप्ना पाटकर यांच्यासंबंधी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केले. तो विषय बाजूला करण्यासाठी तर कुणाल कामराकडून असे बोलून घेतल नसेल ना? अशी शंका व्यक्त करत राजकारण खूप खालच्या स्तराला गेले आहे. एखाद्या कॉमेडियनकडून अशी भाषा बोलवून घेतली असेल तर हे चुकीचे आहे. अशा पद्धतीने राजकारणाचा वापर बंद केला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
प्रशांत कोरटकरविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, कोरटकर चिल्लर माणूस आहे, असे म्हणणारे मुख्यमंत्रीच त्याला का पाठीशी घालत आहेत? दरम्यान, हे सगळे खालच्या दर्जाचे राजकारण सुरू आहे. यावर गृहमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे. कारवाई का होत नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. संजय निरुपम, नितेश राणे यांच्याकडून गुंडगिरीची भाषा कशी वापरली जाते. ही भाषा, दादागिरी कधी बंद होणार, असा प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना पडला आहे, असेही त्या म्हणाल्या.
संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबद्दल बोलताना दमानिया म्हणाल्या की, ३ महिने उलटले तरी कृष्णा आंधळे फरार कसा आहे, दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावे अजुन चार्जशीटमध्ये माहीत. त्यांना सहआरोपी केले गेले नाही. त्यांच्या व्हाट्सएप संभाषणाची माहिती मी पोलीस अधिक्षकांना दिली होती, असेही त्या म्हणाल्या.