मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कंत्राटदार खत्री याने सिंचन घोटाळ्यातून पैसा कमावला आहे. त्यातून त्याने वांद्रे येथे स्वत:च्या मुलाच्या नावाने प्रॉपर्टी बनविल्या आहेत. या लोकांमुळेच राज्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे. ज्या दिवशी अशा लोकांना शिक्षा होईल, तेव्हा महाराष्ट्र कर्जातून मोकळा होईल. परंतु, दहावी पास वित्तमंत्र्यांच्या डोक्यामुळेच महाराष्ट्राची विल्हेवाट लागली आहे, अशी थेट टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली.
पुणे जिल्ह्यातील मुंढवा येथील जमिन गैरव्यवहाराप्रकरणी अंजली दमानिया यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पार्थ पवार यांच्यावरती तक्रार दाखल करून घेण्याबाबत दिरंगाई होत आहे. हे मी आता खपवून घेणार नाही, असा इशारा देत याबाबतील सर्व कायदेशीर वस्तूस्थिती मी खारगे समितीसमोर मांडली आहे. त्यामुळे आतापर्यंत सिंचन घोटाळा, साखर कारखाना, बँक घोटाळ्याच्या चौकशीमध्ये अजित पवारांचे नाव आले नाही तसेच या प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव पुढे येत नाही आहे, असा आरोपही दमानिया यांनी यावेळी केला.
मुंबईतील वांद्रे कुर्ला संवूलासह वक्फ आणि इतर अनेक जमिनींची पॉवर ऑफ ॲटर्नी शितल तेजवाणी यांच्याकडे असल्याचा दावा दमानिया यांनी केला. शितल हिने अनेक ठिकाणी व्यवहार करण्याचा प्रयत्न केला असून, त्याची माहिती आपण आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडे दिली असल्याचे सांगितले.