Anisha Majgaonkar Returns MNS Pudhari
मुंबई

Anisha Majgaonkar Returns MNS: अनिषा माजगांवकरांची मनसेत ‘घरवापसी’; राज ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश

मुंबई महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून लढलेल्या माजी नगरसेविका अनिषा माजगांवकर यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका अनिषा माजगांवकर यांनी सोमवारी पुन्हा मनसेत प्रवेश केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत माजगांवकर यांचा पक्षप्रवेश झाला. दरम्यान, भांडुपची ही जागा मनसेला मिळायला हवी होती आणि त्यासाठी आपण आग्रही होतो, अशी खंत राज ठाकरे यांनी यानिमित्ताने व्यक्त केल्याचे कळते.

पालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युती केली होती. या निवडणुकीत भांडुपमधील प्रभाग क्रमांक ११४ मध्ये ठाकरे गटाने खासदार संजय दिना पाटील यांची मुलगी राजोल पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मनसेकडून इच्छुक असलेल्या माजगांवकर यांनी नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

राज ठाकरे यांनी त्यावेळी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यानंतरही त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. निवडणुकीत अपक्ष म्हणून लढताना माजगांवकर यांना लक्षणीय मते मिळाली होती.

मात्र, आता संजय दिना पाटील यांनी शिंदे सेनेत केलेला प्रवेश, राजोल पाटील या कोणत्या शिवसेनेत आहेत याबाबतचा संभ्रम अशी भांडुपमधील स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर माजगांवकर आणि मनसेतील दुरावा संपुष्टात आला आहे. सोमवारी झालेल्या पक्षप्रवेशामुळे भांडुपमधील मनसेची संघटनात्मक ताकद पुन्हा वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

चेतन पेडणेकरांवर नवी जबाबदारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चेतन पेडणेकर यांच्यावर पक्षाकडून सोमवारी नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पेडणेकर यांची निवड मुंबई विभागाच्या उपशहर सचिवपदी करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले असून एका वर्षाच्या कालावधीसाठी ही नियुक्ती असणार असून त्यानंतर पदाचा कार्य अहवाल पाहून पुढील मुदतवाढीसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT