Anil Parab Yogesh Kadam Arms License Sachin Ghaywal Controversy :
राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा सख्खा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना दिल्याचा गंभीर आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अनिल परब यांनी आज विधिमंडळाबाहेर मोठा गौप्यस्फोट केला. हा प्रकार म्हणजे पैशांसाठी केलेली ‘मेहेरबानी’ असून, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचे काम आहे, अशी घणाघाती टीका परब यांनी केली. त्यांनी तो दोषमुक्त आहे म्हणून त्याला शस्त्रपरवाना देणं चुकीचं आहे. समजा उद्या दाऊद जर दोषमुक्त ठरला तर त्यालाही तुम्ही शस्त्रपरवाना देणार का असा सवाल देखील केला.
परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन बन्सीलाल घायवळ याच्यावर खून आणि खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. स्थानिक पोलिसांनी त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे शस्त्र परवाना नाकारला होता. मात्र, सचिन घायवळ याने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे या निर्णयाविरुद्ध अपील केले.
या अपीलावर सुनावणी करताना, पोलिसांनी आपल्या अहवालात घायवळची संपूर्ण गुन्हेगारी पार्श्वभूमी नमूद केली होती. या अहवालात न्यायालयाने पुराव्याअभावी त्याची सुटका केली असली तरी, 'ही निर्दोष सुटका नाही' असे स्पष्टपणे नमूद केले होते. तरीही, मंत्री योगेश कदम यांनी पोलिसांचा अहवाल बाजूला सारत, सचिन घायवळ किती 'सज्जन' आहे आणि त्याला रोख रक्कम घेऊन जाण्यासाठी परवाना गरजेचा आहे, असे कारण देत त्याला परवाना मंजूर केला.
परब यांनी या निर्णयावर जोरदार आक्षेप घेतला आहे. ज्या व्यक्तीवर बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, खून आणि खंडणीचे आरोप आहेत, त्याला गृहराज्यमंत्री परवाना देतात म्हणजे ते गुंडांना पाठबळ देत आहेत. "हा माणूस बांधकाम कंपनी संबंधित काम करतो म्हणून त्याला रोख रक्कम बाळगावी लागते, म्हणून त्याला परवाना दिला गेला," या मंत्र्यांच्या भूमिकेवर परब यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांनी उपहासाने विचारले की, घायवळ हा 'शिक्षक' होता असे सांगण्यात आले, मग शिक्षकाला शस्त्र परवाना कशासाठी लागतो?
हा प्रकार व्यवसायातील स्पर्धा नसून, पुण्यातील गँगवॉरला प्रोत्साहन देणारा आहे. परब यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे थेट मागणी केली आहे की, त्यांनी तत्काळ योगेश कदम यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी. जर या प्रकरणावर कारवाई झाली नाही, तर शिवसेनेला लोकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्री एवढे का हतबल आहेत. त्यांची प्रतिमा मलीन होत आहे असं देखील अनिल परब म्हणाले.