

खेड : अनिल परब हे अर्धवट वकील आहेत. सभागृहात एका मंत्र्यावर आरोप करायचे असतील त्यावेळी त्याला 35 ची नोटीस द्यावी लागते. परब हे कसे वकील झाले मला माहिती नाही. मंत्री योगेश कदम हे सभागृहात उपस्थित नसताना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता खोटे आरोप त्यांच्यावर करण्यात आले. याबाबत अनिल परब यांनी स्वतः राजीनामा द्यावा आणि हक्कभंगाला सामोरे जावे, असा पलटवार शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. मंगळवारी (दि.२२) खेड त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
कदम म्हणाले, अनिल परब यांनी खोटे आरोप केले आहेत. आम्ही डान्सबार चालवत नाही, तर डान्सबार फोडतो. सावली बार प्रकरणी परब सांगत असल्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला असता तर तो मालकावर दाखल व्हायला हवा होता. परंतु पोलिसांनी तेथील मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आम्ही कधी लोकांची कुटुंब उद्ध्वस्त होतील अशी कामे केली नाहीत,’ असे सांगितले.
‘अनिल परब आणि उद्धव ठाकरे यांनी माझ्या मुलाला दापोलीमध्ये उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीत ठाकरेंनी फौज उतरवून देखील योगेश कदम निवडून आले. त्यामुळे तिथे काही चालले नाही म्हणून असे खोटे आरोप केले जात आहेत. योगेश कदम यांचा बार आणि वाळू याच्याशी कोणताही संबंध नाही. अनिल परब यांच्या विरोधात हक्कभंग आणणारच’, असा इशारा कदम यांनी दिला.