मुंबई : सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या राड्यावरून ठाकरे गटाचे आमदार ॲड. अनिल परब यांनी शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटावर जोरदार फटकेबाजी केली. साताऱ्यात दोन राजेंनी मार खाल्ला. सत्ताधारी मंत्रीच मार खात असतील तर सर्वसामान्यांना सरकार काय संरक्षण देणार, असा सवाल करत मंत्री मार खाताहेत, भाजप चिरडून काढतेय आणि ते भाजपचे नाव घ्यायला घाबरत आहेत. त्यामुळे हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडून दाखवा, असे थेट आव्हान परब यांनी शिंदे गट आणि अजित पवार गटाला दिले.
विधान परिषदेत नियम 280 अन्वये ठाकरे गटाचे आमदार ॲड. अनिल परब यांनी मंत्र्यांना झालेल्या मारहाणीचा मुद्दा उपस्थित करत शिंदे गट आणि अजित पवार गटाला लक्ष्य केले. आज शहीद दिन आहे. पण आजच्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच न घडलेली गोष्ट आज बघायची वेळ आली आहे. काही वर्षापूर्वी सत्तेसाठी उठाव केला गेला. आमचा स्वाभिमान राष्ट्रवादी काँग्रेस चिरडतेय, आमचा स्वाभिमान राष्ट्रवादी पायाखाली दाबतेय, अजितदादा आम्हाला निधी देत नाही, आम्हाला चांगली वागणूक देत नाही, म्हणून उठाव केला गेला. त्यासाठी आम्ही सत्तेतून बाहेर पडलो, त्यासाठी सत्तापालट केली. आम्ही वाघाचे बच्चे आहोत, अशी कारणे सांगितली गेली. पण आता राज्याचे मंत्री मार खाताहेत आणि मंत्र्यांची एवढी वाईट परिस्थिती आहे की ते भाजपचे नाव घ्यायला घाबरत आहेत. मार खाऊन मूग गिळून गप्प बसता. मग कुठे गेला तुमचा स्वाभिमान, कुठे गेली तुमची बंडखोर वृत्ती, असे सवाल करत स्वत:ला वाघ समजणारे आता शेपटी घालून बसले आहेत, कोणाची हिंमत होत नाही भाजपला विचारायची, अशा शब्दांत परब यांनी शिंदे गटावर हल्ला चढवला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनीही मार खाल्ला, याचेही वाईट वाटते. म्हणजे शिवसेनेनेच नव्हे, तर राष्ट्रवादीनेही मार खाल्ला आहे, असेही परब म्हणाले.
उपसभापतींवर अविश्वास ठराव?
उपसभापतींनी एका आयपीएस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. पण काही दिवसांपूर्वी विधानसभेत तालिका अध्यक्षांनी एका आयएएस अधिकाऱ्याला निलंबित केले. पण नंतर नामुष्कीने त्या अधिकाऱ्याला परत घेतले, असा दाखला देत तुम्हाला तुमचे अधिकार वापरायचे असतील तर ज्या अधिकारात आपण खाली पिटलो गेलो, मार खाल्ला तोच अधिकार तुम्ही येथे वापरत आहात, याकडे परब यांनी लक्ष वेधले. हा सत्तेचा दुरुपयोग असून त्यामुळे उपसभापतींवर अविश्वासाचा ठराव का आणू नये, असा संतप्त सवालही परब यांनी केला.
भाजपच्या कानाखाली मारून दाखवा!
कल्याणच्या महापालिका निवडणुकीत तत्कालीन एसपी परमबीरसिंहने त्रास दिला म्हणून यांच्या नेत्यांनी भर व्यासपीठावर राजीनामा दिला होता. त्यामुळे आता कुठे गेले ते शौर्य, कुठे गेली ती ताकद? असा सवाल करत फक्त आमच्या शिवसेनेसोबत दादागिरी करायची...आणि भाजपसमोर शेपटी घालायची, अशा शब्दांत परब यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. त्यामुळे आज तुम्ही सत्तेतून बाहेर पडून दाखवा. तुम्ही सत्तेतून बाहेर पडलात तर आम्ही तुम्हाला भगतसिंह यांच्या जागी बघू, असे सांगत तुमचा आवाज दाबणाऱ्या, तुमच्या बाजूला बसलेल्यांच्या एकदा तरी कानाखाली मारून बघा. कधीतरी हिंमत दाखवा, असे थेट आव्हान परब यांनी दिले.
आम्हाला डिवचू नका! ः शंभूराज देसाई
परब यांच्या आरोपावर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही उठाव करताना यांची प्रेते येतील, कोथळे काढू असे बोलले जात होते. पण आम्ही
खुलेआम आलो. विधान भवनात येऊन विश्वासदर्शक ठराव संमत केला. त्यामुळे आम्हाला विनाकारण डिवचू नका, असा इशारा देसाई यांनी दिला. आम्ही हिंदुत्वासाठी भूमिका घेतली. बाळासाहेब ठाकरे व अटलबिहारी वाजपेयी यांनी केलेली युती टिकावी म्हणून आम्ही युती केली. आता युतीमध्ये काही कटू अनुभव आले, पण ते योग्य व्यासपीठावर दुरुस्तही होईल, असेही देसाई म्हणाले. तर आम्ही उठाव केला तेव्हा घाबरलो नाही, असे सांगत शेपटी घालण्याच्या गोष्टी यांनी आम्हाला शिकवू नये. हा राजकीय संस्कार आहे आणि ज्यांना संस्कार नाही ते असे बोलत आहेत, असा टोला मंत्री उदय सांमत यांनी परब यांना लगावला.