मुंबई: अंधेरी सबवेमध्ये पाणी तुंबू नये, यासाठी विविध उपाय योजनांसाठी ५०० कोटी रुपये खर्च केले तरी, प्रमाण कमी होईल, पण पाणी तुंबणारच, असे स्पष्ट मत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्थायी समिती व्यक्त केले. त्यामुळे अंधेरी सबवेमध्ये पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यापासून अंधेरीकरांची सुटका नाही.
पावसाळ्यात अंधेरी सबवेमध्ये तुंबणाऱ्या पाण्यावरून दरवर्षी मुंबई महापालिकेला टार्गेट करण्यात येते. याकडे अनेकदा स्थायी समितीतही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. अखेर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सत्य काय ते सांगून टाकले.
अंधेरी सबवे हा सखल असून येथे एकाच वेळी १३ मीटर रुंदीच्या नाल्यातून पाणी वाहत येते. हे पाणी सुमारे दीड लाख घनमीटरपेक्षा जास्त असते. पण पाण्याचा निचरा करण्यासाठी जेमतेम तीन ते चार मीटर रुंदीचा नाला आहे.
त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास विलंब लागतो. परिणामी अंधेरी सबवे ४० मिमी पावसातही तुडुंब भरून जातो. या सबवेतील पाण्याचा तातडीने निचरा व्हावा यासाठी भूमिगत टाक्या बांधता येतील. परंतु टाकी बांधूनही फारसा फायदा होणार नाही.
मिलन सबवे येथे तुंबणारे पाणी भरतीच्या वेळी समुद्रात सोडणे शक्य नसल्यामुळे हे पाणी ओहोटी लागेपर्यंत एका भूमिगत टाकीमध्ये साठवण्यात येते. पर्जन्य जलवाहिनी खात्याने ३० हजार घन मीटर तीन कोटी लिटर क्षमतेची भूमिगत साठवण टाकी बांधली आहे. परंतु अंधेरी सबवे येथे अशा प्रकारच्या तीन टाक्या बांधल्यास पाण्याचा निचरा करणे शक्य होईल.
मात्र एवढी मोठी जागा उपलब्ध नाही. सबवेखाली टाकी बांधायची झाली तरी ते शक्य नाही. मोगरा नाल्यामध्ये उभारण्यात येणाऱ्या पंपिंग स्टेशनमुळे काही प्रमाणात फायदा होईल. पण अंधेरी सबवे व आजूबाजूला शासनाच्या पाण्याचा १०० टक्के तातडीने निचरा करणे शक्य नाही.
नवीन उपाययोजनेमुळे सध्या २० ते २५ दिवस तुंबणारे पाणी १० ते १२ दिवसांवर येईल. परंतु पूर्णपणे तुंबणारे पाणी रोखणे शक्य नसल्याचे अभिजीत बांगर यांनी यावेळी स्पष्ट केले.
नवीन उपाययोजनांचा अभ्यास करू
आयआयटी मुंबई यांच्या अभ्यासानुसार अंधेरी सबवेमध्ये तुंबणाऱ्या पाण्याला उपाय नाही. परंतु या पाण्याचा लवकरात लवकर निचरा करण्यासह नागरिकांना दिलासा देण्यासाठी अन्य उपाययोजनांचा अभ्यास करण्यात येईल, यात मोगरा नाल्यामध्ये लवकरच मिनी पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे अभिजीत बांगर यांनी स्थायी समितीला सांगितले.
पावसाळ्यात किमान २५ ते ३० वेळा सबवे बंद
पावसाळ्यामध्ये अंधेरी सबवे किमान २५ ते ३० वेळा बंद पडतो. त्यामुळे येथील वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागते. एवढेच काय तर अंधेरी सबवेमध्ये तुंबणारे पाणी एस. व्ही. रोडवर येते. त्यामुळे या प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीवरही परिणाम होतो. अनेकदा वाहतूक ठप्पही पडते. यावर पर्याय म्हणून येथे पश्चिम रेल्वे मार्गावरून उड्डाणपूलही उभारणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे.