मुंबई: सुमारे पावणेसहा लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर हातसफाई करणार्या शिला अरविंद चिंबडे ( ५०) या आरोपी मोलकरणीला डी. एन नगर पोलिसांनी अटक केली आहे. कर्जबाजारी झाल्याने तिने दागिन्यांची चोरी करुन त्यावर कर्ज काढल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
यातील तक्रारदार महिला तिच्या मुलासोबत अंधेरी येथे राहत असून त्यांचा फुल विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडेच शिला ही फेब्रुवारी २०२६ पासून घरकाम करत होती. २३ जूनला तिच्या बहिणीच्या मुलाचा मढ जेट्टी येथे लग्न होते.
त्यामुळे २२ जूनला तिने कपाटातील काही दागिने काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिला कपाटातून सुमारे पावणेसहा लाखांचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. तिने संपूर्ण कपाटाची पाहणी केली, मात्र तिला कुठेच दागिने सापडले नाही.
त्यामुळे तिने डी. एन नगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवस, पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश दराडे, संदीप लगस, सहाय्यक फौजदार प्रशांत बोटे, पोलीस अंमलदार अंकुश गवळी, संग्राम पात्रे, सिमा साबळे, यांनी शिला चिबडे हिला ताब्यात घेतले होते.
तिच्या बँक खात्यातील पासबुकची तपासणी केल्यानंतर त्यात तिने एका खासगी कंपनीतून साडेपाच लाखांचे सोने तारण कर्ज घेतले होते. या कर्जाविषयी विचारणा केल्यानंतर तिनेच सोन्याच्या दागिन्यांवर हातसफाई केल्याची कबुली दिली. फेबुवारी ते जून २०२६ या कालावधीत घरात कोणीही नसताना तिने घरात प्रवेश करुन विविध सेान्याचे दागिने चोरी केले होते.
आणखी एक गुन्हा उघडकीस
तिच्यावर कर्ज झाले होते, ते कर्ज फेडण्यासाठी तिने सोन्याच्या दागिन्यांची चोरी करुन चोरीच्या दागिन्यांवर कर्ज घेतल्याचे सांगितले. तपासात तिच्याविरुद्ध वर्सोवा पोलीस ठाण्यात अशाच एका चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
याच गुन्ह्यांत नंतर तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला रविवारी दुपारी वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर केले होते. तिच्याकडून चोरीचे सर्व दागिने लवकरच हस्तगत केले जाणार आहेत.