Crime News pudhari photo
मुंबई

Mumbai Crime : ५ कोटींच्या कर्जाच्या आमिषाने चित्रपट निर्मात्याची फसवणूक

फायनान्स कंपनीच्या मालकासह दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पाच कोटीचे कर्ज देण्याची बतावणी करून ई रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटीसाठी घेतलेल्या दहा लाखांचा अपहार करून एका चित्रपट निर्मात्याची फसवणूक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कौशिक लाठिया व लविन कन्हैय्यालाल परयानी या दोघांविरुद्ध आंबोली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील कौशिक हा हरेकृष्णा फायनान्स कंपनीचा मालक असून त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

हेमंतकुमार विठ्ठलराव महाले हे अंधेरीतील चारबंगला, आरटीओ लेन, मोहिद हाईट्स अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांची एच. जी इंटरटेंन्टमेंट नावाची एक चित्रपट निर्मिती संस्था आहे. २०१८ पासून ते त्यांच्या संस्थेमार्फत चित्रपट निर्मितीचे काम करतात. त्यासाठी त्यांना पैशांची गरज होती. कर्जाच्या शोधात असताना त्यांना एक जाहिरात दिसली होती.

ही जाहिरात कौशिक लाठिया यांच्या हरेकृष्ण फायनान्सची होती. जाहिरातीत त्यांचा मोबाईल क्रमांक होता. त्यामुळे त्यांनी त्यांना संपर्क साधून कर्जाविषयी चर्चा केली. याबाबत त्यांच्यात २३ नोव्हेंबर २०२५ रोजी एक झुम मिटींग झाली. या चर्चेत त्याने त्यांना चित्रपट निर्मितीसह इमारत पुनर्विकास, प्रोजेक्ट फायनान्स, प्रॉपर्टी गहाण आदींवर त्यांची कंपनी कर्ज देते. दहा कोटीपर्यंत वार्षिक दहा टक्के तर दहा ते शंभर कोटीच्या कर्जावर सहा टक्के व्याजदर आहे. कर्जापूर्वी त्यांना एक टक्के ई-रजिस्ट्रेशन फी व एक टक्के स्टॅम्प ड्यूटी भरावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम ट्रान्स्फर केली जाईल. कर्जासाठी मासिक हप्त्याची गरज नसून एकाच वेळेस व्याजासह मुद्दल रक्कम भरण्याची मुभा दिली जाते असे सांगितले.

यावेळी हेमंतकुमारने त्यांच्याकडे पाच कोटींच्या कर्जाची मागणी केली. त्यासाठी त्यांनी प्रत्येकी एक टक्क ई रजिस्टेशन व स्टॅम्प ड्यूटीसाठी त्यांना दहा लाख तीन हजार रुपये दिले. या पेमेंटनंतर त्यांच्या बँक खात्यात पाच कोटी ट्रान्स्फर होतील असे सांगितले. मात्र त्याने कर्जाची रक्कम बँक खात्यात ट्रान्स्फर केली नाही. त्यामुळे त्यांनी त्याला कॉल केला असता त्याने त्यांना त्यांचे वकिल कामात व्यस्त असून लवकरच ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर होईल, असे सांगितले. मात्र पैसे ट्रान्स्फर झाले नाहीत.

या प्रकारानंतर त्यांनी फसवणुकीचा एक व्हिडीओ बनवून तो सोशल मिडीयावर अपलोड केला. हा व्हिडीओ पाहून त्यांना एकाने कॉल करून कौशिकने अशाच प्रकारे अनेकांना कर्जाच्या आमिषाने गंडा घातल्याची माहिती दिली. त्यांचीही त्याने फसवणूक केली होती. काही दिवसांनी त्यांना कौशिकतर्फे लविन परयानी याने फोन करून त्यांच्या बँक खात्यात नऊ लाख तीन हजार रुपये ट्रान्स्फर करतो असे सांगून एक लाख कमिशन म्हणून त्याच्याकडे राहतील, असे सांगितले. मात्र त्यानेही पैसे जमा केले नाहीत. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच हेमंतकुमार महाले यांनी आंबोली पोलिसांत तक्रार केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT