मंगळावरील हवामान बदलाचे प्राचीन पुरावे pudhari photo
मुंबई

Planetary climate evolution : मंगळावरील हवामान बदलाचे प्राचीन पुरावे

आयआयटी मुंबईचा संशोधन अहवाल; थौमासिया हायलँड प्रदेशाचा अभ्यास

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मंगळावर एकेकाळी पृथ्वीसारखे उष्ण आणि आर्द्र हवामान होते, पण पुढील काही कोटी वर्षांत ते शीत, बर्फाळ आणि कोरडे बनत गेले आहे. याबाबत भारतीय व आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या नव्या अभ्यासातून ही महत्त्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. आयआयटी मुंबईचे प्रा. आलोक पोरवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळावरील प्राचीन थौमासिया हायलँड प्रदेशाचा सखोल अभ्यास करून नोआकियन कालखंडापासून हेस्पेरियन कालखंडापर्यंत झालेल्या हवामानातील परिवर्तनाचा मागोवा घेत याबाबत अहवाल तयार केला.

पृथ्वी आणि मंगळ या दोन्ही ग्रहांचा उगम एका धूलिमेघापासून झाला. सुरुवातीच्या अवस्थेत त्यांची रचना व वातावरण जवळजवळ सारखे होते. तरीही पृथ्वीवर जीवन फुलले, तर मंगळ थंड, कोरडा वाळवंटी ग्रह कसा बनला, हा संशोधनाचा मुख्य प्रश्न होता. मंगळावरील सगळे पाणी नेमके कोठे गेले? आणि बदल कोणत्या टप्प्यावर झाला? असा प्रश्न प्रा. पोरवाल आणि त्यांच्या पथकाने उपस्थित केला आणि त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. या अभ्यासासाठी संशोधकांनी इस्रोच्या मंगळयानाचे (मार्स ऑर्बिटर मिशन) चित्रण, तसेच नासा आणि ईएसएच्या उपग्रहांची उच्च-रेझोल्यूशन प्रतिमा आणि एलिव्हेशन मॉडेल्सचा वापर केला.

थौमासिया प्रदेशातील 150 हून अधिक दऱ्यांच्या गुंतागुंतीच्या जाळ्यांचे तपशीलवार नकाशे तयार करण्यात आले. नंतर या दऱ्यांवरील क्षरणकारक घटकांचा अभ्यास करून पाण्यामुळे तयार झालेल्या वी-आकाराच्या दऱ्या आणि हिमनदीमुळे बनलेल्या यू-आकाराच्या दऱ्यांचे परिमाणात्मक विश्लेषण करण्यात आले. या विश्लेषणात असे दिसून आले की, विषुववृत्ताजवळील प्रदेशात पाण्याचे प्रवाह प्रबळ होते, तर दक्षिणेकडे जाताना हिमनद्यांचे पुरावे अधिक स्पष्ट स्वरूपात दिसतात.

नोआकियन काळात पृष्ठभागावरून वाहणारे पाणी दऱ्या तयार करत होते; मात्र हेस्पेरियन काळापर्यंत वातावरण थंड होऊ लागले आणि बर्फ, गोठलेली जमीन व हिमनद्यांचा प्रभाव वाढत गेला. उल्कापाताने तयार झालेल्या खळग्यांच्या रचनेतही बर्फाची उपस्थिती स्पष्ट होते. काही खळग्यांभोवती दाट, गाळमिश्रित द्रव वाहिल्याचे चिन्ह दिसते. जे पृष्ठभागाखालच्या गोठलेल्या पाण्यामुळेच शक्य होते. त्यामुळे मंगळावरील पाण्याचा मोठा भाग पर्माफ्रॉस्टसारख्या गोठलेल्या थरांमध्ये साठला असावा, असा अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे.

  • या संशोधनातून मंगळावरील हवामानाचा उत्क्रांतीक्रम अधिक स्पष्ट झाला असला, तरी दऱ्यांचे जाळे, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचा अचूक कालावधी यामधील संबंध आणखी सूक्ष्म अभ्यासाची गरज असल्याचे पथकाने नमूद केले. भविष्यातील मंगळ मोहिमांत अधिक व्यापक भूभौतिकीय माहिती गोळा केल्यास हा गूढ इतिहास अधिक स्पष्टपणे उलगडू शकेल, असे प्रा. पोरवाल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT