मुंबई : अमरावती येथील स्त्री रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर राज्यातील वैद्यकीय संस्थांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजनांना वेग आला आहे. व्हेंटिलेटरसारख्या महत्त्वाच्या वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी नवीन ‘एसओपी’ (मानक कार्यपद्धती) तयार करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार असून, विभागाच्या अखत्यारितील सर्व रुग्णालयांचे इलेक्ट्रिकल आणि फायर ऑडिट त्रयस्थ संस्थेमार्फत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारित सुमारे ३५ वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभाग, नवजात शिशू अतिदक्षता विभाग, स्त्रीरोग विभाग यांसह विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हेंटिलेटरचा वापर केला जातो. रुग्णाला स्वतःहून पुरेसा श्वास घेता येत नसल्यास व्हेंटिलेटरच्या माध्यमातून फुफ्फुसांमध्ये हवा तसेच आवश्यकतेनुसार ऑक्सिजन पोहोचविला जातो. त्यामुळे या उपकरणाची गुणवत्ता, तांत्रिक सुरक्षितता आणि योग्य देखभाल अत्यंत महत्त्वाची आहे.
सध्या वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी संबंधित रुग्णालयातील तज्ज्ञांची तांत्रिक समिती नियुक्त केली जाते. मात्र, व्हेंटिलेटरसारख्या संवेदनशील उपकरणांच्या खरेदीत तांत्रिक बाबींसह सुरक्षिततेचे सर्व निकष काटेकोरपणे तपासले जावेत, यासाठी राज्यस्तरावर तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे. ही समिती उपकरणांची निवड, तांत्रिक निकष, गुणवत्ता, सुरक्षितता आणि खरेदी प्रक्रियेबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणार आहे.
व्हेंटिलेटरसारखी उपकरणे खरेदी करताना राज्य वैद्यकीय प्राधिकरणाने निश्चित केलेल्या प्रक्रियेचे पालन करण्याच्या सूचना सरकारी आरोग्य संस्थांना देण्यात आल्या आहेत. या प्राधिकरणामार्फतच उपकरणांची खरेदी केली जाते. मात्र, अमरावती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या प्रक्रियेत आणखी सुरक्षितता आणि गुणवत्ता निकष समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इलेक्ट्रिकल, फायर ऑडिटही त्रयस्थ संस्थेकडून
अमरावतीतील दुर्घटनेनंतर रुग्णालयांच्या विद्युत यंत्रणेची तसेच अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणेची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही तपासणी त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. रुग्णालयातील विद्युत भार, वायरिंग, उपकरणांची जोडणी, अग्निशमन यंत्रणा आणि आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था यांची तपासणी या माध्यमातून केली जाणार आहे.
‘अमरावती येथील दुर्घटनेनंतर रुग्णालयांना इलेक्ट्रिकल आणि अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणेचे त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. व्हेंटिलेटरसारखी उपकरणे खरेदी करण्यासाठी नवीन एसओपी तयार करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे.’हसन मुश्रीफ, मंत्री, वैद्यकीय शिक्षण