Dombivli Crime : डोंबिवलीत भीतीपोटी हाताची नस कापून महिलेने जीवन संपवले

बँक खात्याचा सायबर फसवणुकीसाठी वापर झाल्याची दिली होती नोटीस
Dombivli financial fraud case
Dombivli financial fraud casepudhari photo
Published on
Updated on

डोंबिवली : बँक खात्याचा लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी वापर करण्यात आला आहे. याप्रकरणी देशात विविध भागांतील पोलिस ठाण्यांतून गुन्हे दाखल आहेत. अशाच गुन्ह्याच्या एका तपासात राजस्थान राज्यातील पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याची डोंबिवलीकर गृहिणीला नोटीस दिली.

या प्रकाराने चिंताग्रस्त झालेल्या या ३८ वर्षीय गृहिणीने मंगळवारी सायंकाळी धारदार पात्याने वार करून स्वत:चे जीवनच संपुष्टात आणले. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संबधित मृत महिला महिला डोंबिवली पूर्वेकडे जिमखाना रोडला असलेल्या सांगर्ली गावातील एका सोसायटीत राहत होती. या प्रकरणी तिची नातेवाईक असलेल्या महिलेने दिलेल्या माहितीवरून मानपाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Dombivli financial fraud case
Marathi Sahitya Sammelan 2027 : 100 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ठाणे शहराला मिळावे

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबधित महिलेच्या बॅकेचे खाते टिळकनगर परिसरात होते.. त्या नियमितपणे त्याचा वापर करत होत्या. ८ ऑगस्ट रोजी राजस्थान राज्यातील चुरू पोलिस ठाण्याच्या सायबर सेलचे एक पथक त्यांच्या सांगर्ली येथील घरी आले. तुमच्या बँक खात्याचा वापर ऑनलाईन फसवणुकीसाठी करण्यात आला असून चुरू पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ६१ (२) सह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. त्यामुळे चौकशीसाठी चुरू सायबर पोलिस ठाण्यात हजर रहावे, अशी नोटीस त्या पथकाने संबधित महिलेला दिली.

आपण कधीही नियमबाह्य व्यवहार केला नसताना आपल्याला ही नोटीस का देण्यात आली? याची शहानिशा करण्यासाठी संबधित महिला या ठाणे पोलिस आयुक्तालयातील सायबर गुन्हे विभागात गेल्या. तेथील अधिकाऱ्यांनी माहिती घेतल्यानंतर तुमच्या बँक खात्याचा वापर करून अनेक लोकांची फसवणूक झाली असून तुमच्या विरोधात दिल्ली, हरियाणा, राजस्थान, आंध्रप्रदेश, बिहार, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांतील सायबर पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती त्यांना दिली.

हा सर्व प्रकार समजल्यानंतर महिला प्रचंड भयभीत आणि अस्वस्थ झाल्या. त्याच मानसिक तणावात मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी यांनी हाताची नस व गळ्यावर धारदार पात्याने वार केले. यात त्या गंभीररीत्या जखमी झाल्या. नातेवाईकांनी संबधित महिलेला तातडीने जवळच्या खासगी रूग्णालयात नेले. तेथील डाॅक्टरांनी प्रथमोपचार करून महिलेला तातडीने केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात नेण्याची सूचना केली. शास्त्रीनगर रूग्णालयातील डाॅक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

Dombivli financial fraud case
RTO Marathi language inspection : मराठी शिकवणारे वर्ग १३ दिवसांपासून बंद

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणी चौकस तपास सुरू केला आहे. दरम्यान या घटनेमुळे सायबर गुन्हेगारांकडून सामान्य नागरिकांची बँक खाती भाड्याने घेऊन किंवा फसवून त्याचा गैरवापर करण्याच्या प्रकारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.ही बाब चिंताजनक असून याविषयी नागरिकांनी सजग राहून व्यवहार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news