Ashok Kharat VSR Connection: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी बोंदू बाबा अशोक खरात आणि व्हीएसआर (VSR) विमान कंपनीच्या संबंधांबाबत अत्यंत गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. २७ जानेवारी रोजी अजित पवार नेमके कोणाच्या सांगण्यावरून विमानात बसले होते आणि त्यांना रस्ते मार्गाने जाण्यापासून कोणी रोखले होते, हे सर्व प्रश्न अद्याप गुलदस्त्यात असल्याचे मिटकरींनी म्हटले आहे.
अमोल मिटकरी यांनी थेट आरोप केला आहे की, "हा बोंदू बाबा अशोक खरात व्हीएसआर विमान कंपनीशी संबंधित असून, या कंपनीचा 'व्हीके सिंग' हा खरातचा मोठा भक्त आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निपक्षपाती चौकशी होणे गरजेचे आहे." अजित दादांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पावले उचलावीत, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
मिटकरी यांनी अशोक खरातच्या १६ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीतील कॉल डिटेल्स (CDR) आणि बँक खात्यावरील व्यवहारांची तपासणी करण्याची मागणी केली आहे. यात त्यांनी एक खळबळजनक मुद्दा मांडला की, तो या काळात ठाण्यातील एका हॉटेलमध्ये थांबला होता.
"जर सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी केली नाही आणि खरातचा सीडीआर काढला नाही, तर महाराष्ट्रातील जनतेचा आगडोम उसळेल. ही संतापाची आग ईशान्येश्वर मंदिराच्या गाभऱ्यापर्यंत पोहोचेल," असा इशाराही मिटकरी यांनी दिला आहे. अजित पवारांच्या सुरक्षेच्या संदर्भात झालेल्या या कथित षडयंत्रामागे नेमके कोण आहे, हे समोर येण्यासाठी खरातची चौकशी अनिवार्य असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील खरातला सर्वाधिक कॉल करणाऱ्यांमध्ये रूपाली चाकणकर यांचा दुसरा क्रमांक लागतो अशी धक्कादायक माहिती दिली.
"अशोक खरातला या काळात सर्वाधिक कॉल त्याच्या मुलीने केले होते. मात्र, त्याखालोखाल सर्वाधिक कॉल करण्यात दुसऱ्या क्रमांकावर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर होत्या." असे म्हणत चौकशीची मागणी केली.