Amitabh Bachchan |
मुंबई : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवले. यानंतर निर्माण झालेल्या भारत-पाकिस्तान तणावपूर्ण परिस्थितीवर महानायक अमिताभ बच्चन यांनी शनिवारी पहिली प्रतिक्रिया दिली होती. याआधी त्यांच्या शांततेवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. रविवारी रात्री बच्चन यांनी पुन्हा सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी रामचरितमानसचा उल्लेख केला आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर अमिताभ बच्चन यांनी केलेल्या पोस्टमध्ये तुलसीदास यांच्या रामचरितमानसमधील एक ओळ लिहिली आहे. “सूर समर करनी करहिं, कहि न जनावहिं आप” या ओळीचा अर्थ स्पष्ट करताना त्यांनी लिहिले की, “शूरवीर युद्धात आपले शौर्य दाखवतात. ते कधीही केवळ शब्दांत आपली वीरता सांगत नाहीत. कायर लोकच शत्रू समोर आल्यानंतर मोठ-मोठ्या शौर्याच्या गप्पा मारतात.” ही ओळ रामचरितमानसातील लक्ष्मण-परशुराम संवादातून घेतलेली आहे.
या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी आपल्या वडिलांचा म्हणजेच कवी हरिवंश राय बच्चन यांचा उल्लेखही केला आहे. त्यांनी लिहिले, “ही ओळ म्हणजे एक सखोल सत्य व्यक्त करणारी ओळ आहे. युद्धात खरे वीर त्यांची वीरता दाखवतात, ते स्वतःची स्तुती करत नाहीत. जे शत्रूला पाहून फक्त आपल्या शौर्याचा अभिमान बाळगतात ते खरेतर कायर असतात.” बिग बी पुढे लिहितात की, “बाबूजींनी ही ओळ 1965 मध्ये पाकिस्तानविरुद्ध युद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या कवितेत वापरली होती. भारताने हे युद्ध जिंकले आणि 1968 मध्ये त्याच कवितेसाठी बाबूजींना प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ही गोष्ट जवळपास 60 वर्षांपूर्वीची असली तरी, त्यातली दृष्टी आणि सत्य आजच्या काळातही तितकेच लागू पडते.”
या पोस्टपूर्वीही बच्चन यांनी एक फोटो शेअर केला होता, ज्यात त्यांच्या वडिलांची एक कविता लिहिलेली होती. आता त्यांनी त्या कवितेचा संदर्भ देत सध्याच्या परिस्थितीचे वर्णन केले आहे.