File Photo
मुंबई

Ameesha Patel House Theft : अभिनेत्री अमीषा पटेलच्या घरी चोरी! आई-वडिलांच्या घरातून ५ लाखांचे दागिने लंपास

मरीन ड्राईव्ह पोलिसांनी घरकाम करणार्‍या महिलेला केली अटक, १५ सप्‍टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

Ameesha Patel Parents House Theft : बॉलीवूड अभिनेत्री अमीषा पटेलच्या आई-वडिलांच्या चर्चगेट येथील फ्लॅटमधून ५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी धडक कारवाई करत पालघर येथील सीमा घाटे (वय ४०) या घरकाम करणाऱ्या महिलेला अटक केली आहे.

मोलकरीण गेल्या दीड वर्षांपासून होती घरकामाला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सीमा घाटे ही गेल्या दीड वर्षापासून अभिनेत्रीची आई आशा पटेल यांच्या घरी घरकाम करत होती. जानेवारी २०२६ मध्ये घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. या चोरीबाबत आशा पटेल यांना घरकाम करणाऱ्या सीमा घाटेवरच दाट संशय होता. त्यामुळे गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून आशा पटेल तिला चोरीची कबुली देऊन दागिने परत करण्यास सांगत होत्या.

तक्रारीनंतर मोलकरीण ताब्यात

सीमा घाटेने दागिने परत न केल्याने अखेर आशा पटेल यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे मरीन ड्राईव्ह पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात महिलेविरोधात बीएनएस (BNS) कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम डिटेक्शन टीमने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी सीमा घाटे हिला विरार परिसरातून ताब्यात घेतले.

न्यायालयाने आरोपी महिलेस सुनावली १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिला १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, चोरीला गेलेले दागिने अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसून ते हस्तगत करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तसेच आरोपी महिलेचा यापूर्वी काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT