मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी राज्यभरातून अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल होत असून महापालिका प्रशासनानेही त्यांच्यासाठी चोख व्यवस्था केली आहेत. निवासी मंडप, धूळ प्रतिबंधक आच्छादन, प्रसाधनगृहे, पिण्याचे पाणी, सुरक्षा व आरोग्यविषयक सेवा पुरविण्यात आल्या आहेत. पालिकेचे आठ हजारांहून अधिक कर्मचारी त्यांच्या सेवेत आहेत.
अनुयायांसाठी चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह यासह आवश्यक त्या विविध ठिकाणी या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली.
शिवाजी पार्क येथे 1 लाख चौरस फूट क्षेत्रफळावर जलप्रतिबंधक (वॉटरप्रूफ) निवासी मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. 10 ठिकाणी एलईडी स्क्रीन लावल्या असून 30 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या पायवाटांवर धूळ प्रतिबंधक आच्छादन केले आहे. तर, मैदानाभोवती 1 हजार मीटर लांबीचे तात्पुरते कुंपण लावले आहे. परिसरात स्वच्छतेसाठी 527 कामगार विविध संयंत्रांसह प्रत्येक सत्रात कार्यरत असतील.
दर्शन रांग व मुख्य मार्गांवर एकूण 150 फिरती शौचालये, अभिवादन रांगेत 10, मैदान परिसरात 254 शौचालये, महिलांसाठी पिंक टॉयलेट्सची तसेच नळ व शॉवर सुविधेसह 284 तात्पुरत्या स्नानगृहांची व्यवस्था केली आहे. भ्रमणध्वनी (मोबाईल) चार्जिंग सुविधा व संपूर्ण परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. चैत्यभूमीतील आदरांजलीचे मोठ्या पडद्यांवर व महानगरपालिकेच्या विविध समाजमाध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
सीसीटीव्हीसह निरीक्षण मनोरे
सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, फिरते कॅमेरे व मेटल डिटेक्टर्स, बॅग स्कॅनर्स आदींसह नियंत्रण कक्ष, माहिती कक्ष व निरीक्षण मनोऱ्यांची उभारणी केली आहे. अग्निशमन वाहने, अतिदक्षता रुग्णवाहिका, दादर चौपाटी येथे बोट आदींची व्यवस्था केली आहे.
वैद्यकीय सेवेसाठी 585 मनुष्यबळ
20 रुग्णवाहिका, डेंगी व हिवताप (मलेरिया) बाबत जनजागृतीसाठी कक्ष, आरोग्य तपासणी व औषधोपचार आदी वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली आहे. वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी 585 एवढ्या संख्येने तज्ज्ञ मनुष्यबळ कार्यरत असेल. कीटकनाशक व मक्षिका नियंत्रण फवारणीसाठी देखील मनुष्यबळ नेमण्यात आले आहेत.
16 टँकरने पिण्याचे पाणी
पिण्याच्या पाण्यासाठी 254 नळांसह 16 टँकरची व्यवस्था असून अनुयायांसाठी बिस्किट व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उभारले आहेत.